राज्याच्या राजकारणात उलथापालथ सुरूच आहे. विशेषत: राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात मतभेद झाल्याच्या राज्यात चर्चा सुरु असताना दरम्यान, सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या गटाचे आमदार शरद पवार यांची भेट घेण्यासाठी वायबी चव्हाण केंद्रात पोहोचले. शरद पवारही काही वेळातच येथे पोहोचणार असल्याचे सांगण्यात आले. सर्व आमदार मिळून शरद पवार यांची समजूत काढण्याचा प्रयत्न तर करीत नाही असा सवाल सध्या राज्यातील जनतेच्या मनात सुरु आहे.
शरद पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकारांशी बोलतांना म्हणाले, कालप्रमाणे आजची भेट पूर्वनियोजित नव्हती. शरद पवार चव्हाण सेंटरला येणार असल्याची माहिती काढली. त्यामुळे आम्ही इथे आलो. सर्वांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यांना कालच्या प्रमाणे विनंती केली. पक्ष एकसंघ राहावा अशी विनंती केली. पवारांनी आमचं कालप्रमाणेच म्हणणं ऐकून घेतलं. आम्ही त्यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकत्र ठेवण्याची विनंती केली आणि त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले पण त्यावर काहीही बोलले नाही…
काल रविवारी (१६ जुलै) अजित पवार, छगन भुजबळ, आदिती तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, संजय बनसोडे आणि प्रफुल्ल पटेल शरद पवारांची भेट घेण्यासाठी आले होते. तर दुसरीकडे महाविकास आघाडीची बैठक सुरू होती. महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड (शरद पवार गट) पक्षप्रमुखांना भेटण्यासाठी अजित पवार गट आल्याचे समजताच त्यांनी बैठक अर्धवट सोडून शरद पवार यांची भेट घेण्यासाठी वायबी चव्हाण सेंटर गाठले.
आजपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाला उपस्थित राहिलेल्या राष्ट्रवादीच्या २४ आमदारांपैकी उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, संजय बनसोडे, धनंजय मुंडे, अनिल पाटील आणि धर्मराव आत्राम हे सत्ताधारी पक्षासाठी राखीव जागांवर बसले. अजित पवार यांना पाठिंबा देणाऱ्या आणि सभागृहात उपस्थित असलेल्या आमदारांमध्ये बबनराव शिंदे, इंद्रनील नाईक, प्रकाश सोळंखे, किरण लहमटे, सुनील शेळके आणि सरोज अहिरे यांचा समावेश आहे.