नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन…
नरखेड – अतुल दंढारे
नरखेड तालुक्यातील सावरगाव येथील पत्रकारास अश्लील,जातिवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या शाळा संचालकाविरोधात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने नागपूर ग्रामीणचे पोलीस उप-अधीक्षक(गृह)विजय माहुलकर यांचे वतीने नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले.
यावेळी नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष सुभाष वऱ्हाडे, सरचिटणीस संजय देशमुख,मराठी पत्रकार परिषदेच्या प्रदेश महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर,नरखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश गिरडकर,नरखेड तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी ज्ञानेश्वरराव बालपांडे,सहदेव वैद्य,पप्पू महंत,लक्ष्मीकांत पटेल यांनी पोलीस उप-अधीक्षक(गृह)विजय माहुलकर यांची भेट घेतली.
४ जुलै रोजी नरखेड तालुक्यातील सावरगाव येथील ट्रायअम्प कॉन्व्हेंटची शिक्षण विभागाने परवानगी नाकारल्यामुळे पन्नास ते साठ पालक शाळा सोडल्याचा दाखला मागण्याकरिता जमा झाले होते.शाळा व्यवस्थापन समिती पाल्यांचा दाखला देत नसल्यामुळे काही पालक शाळेच्या समोर गोळा झाले होते.या बातमीचे वृत्तांकन करण्यासाठी स्थानिक पत्रकार गेले होते.
पालकांची बाजू ऐकल्यानंतर यावर शाळा संचालकांची (राईट -टू-रिप्लाय) प्रतिक्रिया घेण्यासाठी पत्रकार योगेश गिरडकर यांनी संस्थाचालक बंडू ऊर्फ तुकाराम किसन तागडे रा.मालापूर ह.मु.नागपूर यांना त्यांच्या मोबाईलवर संपर्क केला असता फोन उचलला नाही नंतर त्यांनी फोन केला व फोन कशासाठी केला होता असे विचारले.
त्यावर पत्रकार योगेश गिरडकर यांनी त्यांना तुमच्या शाळेत पालक टी.सी. मागण्याकरिता आले होते.मात्र शाळा व्यवस्थापन टी.सी.देत नाही असे उपस्थित पालकांनी सांगितले.त्याबाबत तुमची प्रतिक्रिया पाहिजे होती असे म्हटले यावर प्रतिक्रिया न देता बंडू ऊर्फ तुकाराम किसन तागडे यांनी चिडून जाऊन पत्रकार योगेश गिरडकर यांना माझ्या कॉन्व्हेंट ची बातमी देतो का?असे म्हणत जातीवाचक व अश्लील शिवीगाळ केली तसेच आई बहिणी विषयी अपशब्द वापरले आणि जिवे मारण्याची धमकी दिली.
अशा प्रकारे बातमीवर आपली प्रतिक्रिया देताना निष्पक्षपणे दोन्हीही बाजू ऐकून वृत्तांकन करणाऱ्या पत्रकाराला धमकी देण्याचा प्रकार निषेधार्ह आहे.योगेश गिरडकर हे विदर्भातील एका नामांकित वृत्तपत्राचे प्रतिनिधी असून नागपूर जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य व नरखेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुद्धा आहेत.
एका जबाबदार वृत्तपत्राच्या पत्रकाराला शिवीगाळ व धमकी देणाऱ्या आरोपीविरुद्ध त्याच दिवशी सावरगाव येथील पोलीस चौकीत तक्रार दाखल करण्यात आली.परंतु आरोपीविरुद्ध फक्त भादवि कलम ५०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर घटना गंभीर असून या घटनेनंतर त्या परिसरात पत्रकारांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
सदर प्रकरणाची माहिती घेऊन सदर प्रकरणातील आरोपीं विरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.
पत्रकारांनी दिलेल्या निवेदनाचा विषय मा.पोलीस अधीक्षक यांच्यासमोर ठेवणार असून अश्या प्रकारे पत्रकारांवर हल्ले किंवा शिवीगाळ करणे योग्य नाही. याबाबत दोषीवर योग्य ती निष्पक्षपणे कार्यवाही करण्यात येईल.
विजय माहुलकर
पोलीस उप-अधीक्षक(गृह)नागपूर ग्रामीण
बातमी देणे व त्याबाबत प्रतिक्रिया घेणे हे पत्रकारांचे काम आहे.मात्र त्यामुळे अनेक जण चिडून जाऊन शिवीगाळ किंवा हल्ले करतात.अश्याप्रकारे पत्रकारांवर होणारे हल्ले व शिवीगाळ करणे हि गंभीर बाब आहे.याबाबत योग्य चौकशी करून संबंधितांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी अन्यथा नागपूर जिल्हा पत्रकार संघाचे वतीने जिल्ह्यात आंदोलन करण्यात येईल.
सुभाष वऱ्हाडे
कार्याध्यक्ष,नागपूर जिल्हा मराठी पत्रकार