ऋषिकेश सोनवणे
औरंगाबाद
औरंगाबाद – राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातही गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याच आता आणखी एक धक्कादायक घटना औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात घडली आहे.
आई वडील खर्चासाठी पैसे देत नाही म्हणून दुचाकींची चोरी करण्याचा धंदाच फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी सुरू केला.पोलिसांनी चोरीच्या 36 मोटरसायकलसह तब्बल 21 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी या सर्व दुचाकी शेतातून हस्तगत केल्या आहेत. शैलेश आणि विजय अशी दुचाकी चोरांची नावे आहेत. या दोघांवर सहा पोलीस ठाण्यांतील ३७ गुन्हे उघडकीस आले.
दुचाकी चोरांनी धुमाकूळ घातल्यामुळे पोलीस आयुक्तांनी तपासाचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक तपास करताना शैलेश हा दुचाकींची चोरी करून शेतात नेऊन ठेवत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेने शेतात छापा मारला पोलीस आल्याचे समजताच शैलेश पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले.
चौकशीत त्याने दुचाकींच्या चोरी केल्याची कबुली दिली. शेतात लपवून ठेवलेल्या २४ दुचाकीही काढून दिल्या. गावातील मित्र विजय याच्याकडे काही चोरीच्या दुचाकी ठेवल्याचे त्याने सांगितले.