आकोट- संजय आठवले
आकोट शहर व पोलीस ठाण्यांतर्गत पोलिसांचे ताब्यातील संशयित आरोपीचा पोलिसांचे मारहाणीत मृत्यू झाल्याचे संशयावरून न्यायालयीन कोठडीत बंदिस्त असलेले निलंबित पोऊनि राजेश जवरे आणि त्यांचा सहकारी चंद्रप्रकाश सोळंके यांना घोषित केल्यानुसार आकोट न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणातील अंतिम तपास अहवाल न्यायालयात दाखल होईपर्यंत आरोपींना आकोट शहर व तालुक्यात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
मोबाईल चोरी प्रकरणात पोऊनि राजेश जवरे यांनी गोवर्धन हरमकार ह्या युवकास संशयावरून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला अमानुष मारहाण केली. आणि तेथून त्याची रवानगी खाजगी रुग्णालयात केली. परंतु पोलिसांचा मार असह्य होऊन उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. असा आरोप गोवर्धन चे काका सुखदेव हरमकार यांनी आपल्या तक्रारीत केला होता. त्यावरून पोऊनि राजेश जवरे आणि त्यांचा साथीदार हवालदार चंद्रप्रकाश सोळंके यांचे विरोधात आकोट शहर पोलीस ठाण्यात भादवी ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
या दरम्यान या प्रकरणाची चौकशी सीआयडी विभागाकडे सोपविण्यात आली. त्यांनी याप्रकरणी तपास करण्यास प्रारंभ केला. तपासा दरम्यान आरोपींना आकोट न्यायालयाने ९ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. हा कालावधी पूर्ण केल्यावर आरोपींना आकोट न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यास सीआयडी कडून हिरवी झेंडी दाखविण्यात आली. त्यामुळे न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश पारित केला.
अशा स्थितीत सीआयडीचा तपास सुरू असतानाच आरोपींचे वतीने जामीन मिळणेकरिता आकोट न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर दि.१६.५.२०२४ रोजी सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीमध्ये आरोपीचे वकिलांनी या प्रकरणाच्या फिर्यादीतील तारखांचा संदर्भ घेऊन युक्तीवाद केला. त्यावेळी घटनेच्या तारीख व वेळी आरोपी हे अवैध रीव्हाॅल्वर पकडण्याचे मोहिमेत व्यस्त असल्याचे आरोपीचे वकिलांनी न्यायालयाचे निदर्शनास आणले. आणि हाच मुद्दा जामीन मिळणेकरिता प्रभावी ठरल्याची अटकळ आहे.
हा संपूर्ण युक्तिवाद ऐकून न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी या जामीनावर दि.१८ मे रोजी निर्णय देण्याची घोषणा केली. त्यानुसार आज रोजी त्यांनी दोन्ही आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला. आपल्या निर्णय पत्रात आरोपींनी पालन करावयाच्या शर्ती व अटींचे स्वरूप न्यायाधीशांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार आरोपींनी ५० हजार रुपये जामीनाकरिता तर २५ हजार रुपये रोख सुरक्षा ठेव म्हणून न्यायालयात जमा करावयाचे आहेत. आरोपींना तपास कामी संपूर्ण सहकार्य करावयाचे आहे. त्यांना साक्षीदारांशी कोणताही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संपर्क करता येणार नाही.
साक्षीदारांवर दबाव आणता येणार नाही. तपास अधिकारी आदेशित करतील त्याप्रमाणे तपास कामी हजर राहावयाचे आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत आणि तपासाचा अंतिम अहवाल दोषारोप पत्र स्वरूपात न्यायालयात दाखल झाल्यावर फिर्यादी व साक्षीदारांचा पुरावा नोंदविला जाईपर्यंत आरोपींना आकोट शहर व तालुक्यात प्रवेश करता येणार नाही. अंतिम अहवाल दाखल होईपर्यंत पोलीस मुख्यालय अकोला येथे आरोपींनी प्रत्येक सोमवार व गुरुवार या दिवशी दुपारी १२ ते ३ या कालावधीत स्वतःची उपस्थिती न चुकता नोंदवावी लागेल. यातील कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास जामीन आदेश रद्दबातल होणार आहे.
या जामीन आदेशाची पूर्तता संबंधित प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात होणार आहे. अशा अटी व शर्तीसह राजेश जवरे व चंद्रप्रकाश सोळंके यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. या प्रकरणात सीआयडीची बाजू सरकारी वकील अजित देशमुख यांनी तर आरोपींची बाजू सत्यनारायण जोशी अंजुम काझी, रफी काझी, मंगेश बोदडे तेल्हारा यांनी मांडली.