Tuesday, June 25, 2024
spot_img
Homeग्रामीणबुलढाणा । उपवासाच्या फराळातून दोनशे महिला-पुरूषांना विषबाधा...खुल्या जागेत केले रुग्णांवर उपचार...आरोग्य विभागाचा...

बुलढाणा । उपवासाच्या फराळातून दोनशे महिला-पुरूषांना विषबाधा…खुल्या जागेत केले रुग्णांवर उपचार…आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर…

बुलढाणा : लोणार तालुक्यातील खापरखेड सोमठाणा येथील विठ्ठल–रूख्मिणीच्या मंदिरात आज मंगळवारी उपवासाचे फराळ खाल्ल्याने गावातील तब्बल २०० महिला व पुरूषांना विषबाधा झाली असून, त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. या ग्रामस्थांना रात्री उशिरा पोलिस व इतर ग्रामस्थांनी बिबी येथील ग्रामीण रूग्णालयात आणले असता, येथील वैद्यकीय अधिकारी हे गैरहजर होते. त्यामुळे पोलिस व महसूल प्रशासनाने परिसरातील खासगी डॉक्टरांना वैद्यकीय उपचारासाठी पाचारण केले असून, रात्री उशिरा हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोग्य प्रशासनाविषयी संतापाची लाट निर्माण झाली आहे.

खापरखेड सोमठाणा तालुका लोणार येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर आज उपवासाच्या फराळाचा प्रसाद वाटप करण्यात आला. हा प्रसाद खाल्ल्यानंतर काही वेळातच लोकांना प्रचंड वेदना व त्रास होण्यास सुरूवात झाली. अनेकांना ढाळवांत्या सुरू झाल्या. त्यामुळे गावात प्रचंड घबराट पसरली. ही माहिती पोलिस व महसूल प्रशासनाला होताच, त्यांनी व ग्रामस्थांनी विषबाधा झालेल्या ग्रामस्थ महिला व पुरूषांना मिळेल त्या वाहनाने बिबी येथील ग्रामीण रूग्णालयात आणले. परंतु, या रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी हे गैरहजर होते.

त्यामुळे बिबी येथील खासगी डॉक्टरांसह परिसरातील डॉक्टरांना विनंती करून त्यांना या ग्रामीण रूग्णालयात बोलावण्यात आले व तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले होते. उधिरपर्यंत अनेकांची प्रकृती चिंताजनक होती, व त्यांना मेहकर येथे हलवले जाण्याची शक्यता होती. धक्कादायक बाब अशी, की या ग्रामीण रूग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने जागा मिळेल तेथे रूग्णांना टाकण्यात येऊन उपचार सुरू करण्यात आले होते. पोलिस व महसूल प्रशासनाचे अधिकारी जीवितहानी होऊ नये, यासाठी एकीकडे प्रयत्न करत असताना, आरोग्य विभागाचा गलथान कारभार मात्र या दुर्देवी घटनेने चव्हाट्यावर आला होता.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: