Saturday, July 27, 2024
spot_img
HomeMarathi News Todayभेंडवळच्या प्रसिद्ध घटमांडणीचा अंदाज जाहीर...यंदा पाऊस, पिकांबाबत केलं भाकित...

भेंडवळच्या प्रसिद्ध घटमांडणीचा अंदाज जाहीर…यंदा पाऊस, पिकांबाबत केलं भाकित…

बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील घडमांडणीची भविष्यवाणी आज शनिवार ११ मे रोजी जाहीर करण्यात आली आहे. अक्षय्य तृतियेच्या मुहुर्तावर करण्यात येणाऱ्या या घटमांडणीतील भविष्यवाणीमधून पाऊस, पिकपाण्याबाबतचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर निवडणूक आचारसंहितामुळे देशातील राजकीय परिस्थितीबाबतचे भाकित जाहीर करण्यात आले नाही. भेंडवळच्या घटमांडणीमधून करण्यात आलेल्या भाकितानुसार जून, जुलै हे महिने कमी पावसाचे असणार आहेत. तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये चांगला पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

याबाबत माहिती देताना घटमांडणीमधील जाणकारांनी सांगितले की, घटमांडणीतील अंदाजानुसार पहिल्या महिन्यात पाऊस लहरी स्वरूपाचा दिसत आहे. कुठे पडेल तर कुठे पडणार नाही. दुसरा महिनाही तशाच प्रकारचा आहे. पण पहिल्या महिन्यापेक्षा थोडा जास्त पाऊस पडेल. तिसरा महिना एकदम चांगला आहे. या महिन्यात सर्वत्र पाऊस पडेल. चौथा महिनाही सार्वत्रिक पावसाचा आहे. अवकाळी पाऊसही भरपूर पडेल. येथे उपस्थितांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, या घटमांडणीतून मागच्या वर्षी जे भाकित करण्यात आलं होतं ते ९० टक्के खरं झालं आहे. यावर्षीच्या भाकितावर आमचा संपूर्ण विश्वास बसलेला आहे.

घटमांडणीतील भाकितानुसार यावर्षी पाऊस चांगला झाला तरी खरिपाची पिकं साधारण राहतील. तर रब्बीच्या हंगामात गव्हाचं पिक चांगलं येईल, असं सांगण्यात आलं आहे. त्याशिवाय काही पिकांवर रोगराईचा परिणाम होण्याची भीतीही वर्तवण्यात आली आहे. दरवर्षी येथील घटमांडणीमधून राजकीय भाकित केलं जातं. मात्र यावर्षी आचारसंहिता असल्याने तसं भाकित केलं गेलं नसल्याचं सांगण्यात येत आहे.

अशी केली जाते घटमांडणी…
अक्षय तृतीयेला सायंकाळी घटमांडणी करण्यात येते. यावेळी घटामध्ये अंबाडी, कपाशी, ज्वारी, तूर, मूग, उडीद, तीळ, भादली, बाजरी, मटकी, तांदूळ, जवस, लाख, वाटाणा, गहू, हरभरा, करडी आणि मसूर अशी अठरा प्रकारची धान्य गोलाकार मांडण्यात येतात.
घटाच्या मधोमध खड्डा खोदून त्यामध्ये पावसाळ्याच्या चार महिन्यांचे प्रतीक असलेली चार मातीची ढेकळे ठेवण्यात येतात. आणि त्यावर पाण्याने भरलेली घागर ठेवण्यात येते. घागरीवर पृथ्वीचे प्रतीक असलेली पुरी आणि चारा-पाण्याचे प्रतीक असलेले सांडोळी, कुरडई, पापड ठेवण्यात येतात.

बाजूला खाणार म्हणजे चवीचे प्रतीक भजे आणि वडा ठेवण्यात येते. तर घागरीच्या बाजूला राजा आणि राज्याची गादी म्हणजेच पान-सुपारी ठेवण्यात येतात. रात्रभर कुणीही या घटकाकडे फिरकत नाही. त्यानंतर आज सकाळी सूर्योदयापूर्वी घटाचे सूक्ष्म निरीक्षण करत त्यामध्ये रात्रीदरम्यान झालेल्या बदलावरून भाकीत वर्तविले जाते.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: