आकोट – संजय आठवले
आकोट शहरात व्यक्तिमत्व विकास संघटना म्हणून कार्यरत असलेली जेसीआय संघटना दरवर्षी जेसी सप्ताहाचे अनुषंगाने राबवित असलेल्या अनेकविध उपक्रमा अंतर्गत यावर्षी या संघटनेने आयोजित केलेल्या बकरी फॅशन शो ला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून हजारो प्रेक्षकांसमोर तब्बल ५१ बकऱ्यांनी रॅम्प वॉक करून अनेकांना मनोरंजनासह शेळी पालन व्यवसायाची प्रेरणा दिली आहे.
जेसीआय ह्या व्यक्तिमत्त्व विकास संघटनेद्वारे बकरी फॅशन शोच्या आयोजनाचे वृत्त येताच नागरिकांमध्ये या शोबाबत कमालीची उत्सुकता होती. ती उत्सुकता बकरी फॅशन शो मध्ये हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत परिवर्तित झाली. स्थानिक बिलबिले मंगल कार्यालयाचे भव्य प्रांगणात या शोचे आयोजन करण्यात आले होते. बकऱ्यांना चालण्याकरिता चक्क रेड कार्पेट वाॅक रॅम्प तयार करण्यात आली होती. या शोमध्ये सहभागी होण्याकरिता अनेक शेळी पालकांनी ढोल ताशाच्या गजरात आपापल्या शेळ्या शोस्थळी आणल्या होत्या.
शोचे उद्घाटन आकोट ठाणेदार तपन कोल्हे यांनी केले. यावेळी मंचावर मनोज वर्मा, नितीन शेगोकार, अतुल भिरडे आकोट, जेसीआय अध्यक्ष प्रवीण बनसोड हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन सप्ताह प्रमुख विनोद कडू तर प्रास्ताविक स्मित पवार यांनी केले. आभार प्रदर्शन अभिषेक दुबे यांनी केले. यानंतर तब्बल चार तास बकरी फॅशन शो सुरू होता.
या फॅशन शोमध्ये आकोट परिसरातील तब्बल ५१ शेळ्यांनी रॅम्प वॉक केला. या बकऱ्यांसह त्यांचे पालकही सजून धजून शोमध्ये सामील झाले. या शेळी पालकांनी बकरी व्यवसायाचे महत्त्व, बकऱ्यांमुळे होणारे स्वास्थ्य लाभ तथा आर्थिक लाभ याची माहिती दिली. त्यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजनासह ज्ञानवर्धनही झाले. या शोचे गुणांकन डॉक्टर किसन तायडे, बिपिन टावरी व प्रशांत खोडके यांनी केले. यामध्ये प्रथम क्रमांक प्रमोद दिंडोकार, द्वितीय क्रमांक मंगेश नाथे व तृतीय क्रमांक गणेश पारवे यांनी पटकाविला. तर उत्तेजनार्थ पारितोषिकाचे मानकरी सरिता पटेल, अमोल काळे, आयुष गोरडे, हरीश बोरोडे व विनोद सावरकर हे ठरले.