अमरावती – दुर्वास रोकडे
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजासाठी विविध योजना राबविण्यात येतात. चर्मकार समाजाचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळाव्दारे सन 2024-25 या वर्षासाठी अनुदान व बीजभांडवल योजना तर केंद्र शासनामार्फत एनएसएफडीसी योजना राबविण्यात येते. या योजनचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक डि.व्ही. भागवतकर यांनी केले आहे.
50 टक्के अनुदान योजना : या योजनेमध्ये राष्ट्रीयकृत बँकेमार्फत 50 हजार रूपयेपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये बँकेचे सहभाग 40 हजार रूपये व महामंडळाचे अनुदान 10 हजार रूपये असे मिळून 50 हजार रूपये कर्ज दिले जाते. बीज भांडवल योजना : या योजनमध्ये राष्ट्रीयकृत बँकेमार्फत 5 लाख रूपयेपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो.
त्यामध्ये बँकेचे कर्ज 75 टक्के, लाभार्थी सहभाग 5 टक्के व महामंडळाचे अनुदान 10 हजार रूपये असे मिळून 5 लाख कर्ज दिले जाते. केंद्र शासनाच्या योजना : मुदती कर्ज योजना, लघुऋण वित्त योजना, महीला समृध्दी योजना, महिला अधिकारीता योजनेमध्ये महामंडळाचे अनुदान 50 हजार रूपये आहे. तसेच शैक्षणिक कर्ज योजनेमध्ये अनुदान उपलब्ध नाही.