Andre Russell : बांगलादेशात सध्या प्रीमियर लीग खेळली जात आहे. जगभरातील अनेक महान आणि स्टार खेळाडू या लीगमध्ये खेळत आहेत. आंद्रे रसेलने मंगळवारी रात्री बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये धुमाकूळ घातला. रसेलने शानदार खेळी करत आपल्या संघ कोमिल्ला व्हिक्टोरियन्सला हरवलेला सामना जिंकून दिला.
बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये मंगळवारी रात्री कोमिल्ला व्हिक्टोरियन्स आणि रंगपूर रायडर्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात रंगपूरने प्रथम खेळून 150 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात कोमिल्ला व्हिक्टोरियन्स संघाने 15 व्या षटकात 103 धावांत चार विकेट गमावल्या होत्या. रंगपूरचा संघ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, पण त्यानंतर रसेलने आकडे फिरवले.
रसेलने बॅट आणि बॉल या दोहोंनीही चमत्कार केला
103 धावांवर चार विकेट पडल्यानंतर आंद्रे रसेलने केवळ 12 चेंडूत 43 धावांची शानदार खेळी केली. यादरम्यान रसेलच्या बॅटमधून 4 चौकार आणि 4 षटकार आले. रसेलने मोईन अलीसोबत पाचव्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली. मात्र, यात अलीचे योगदान 10 चेंडूत केवळ 5 धावांचे होते.
केवळ 12 चेंडूत नाबाद 43 धावा फटकावण्यासोबतच आंद्रे रसेलने या सामन्यात गोलंदाजीतही अद्भुत कामगिरी केली. रसेलने 2.5 षटकांत 20 धावा देत तीन बळी घेतले. त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा किताबही मिळाला.
Andre Russell in Full Flow 🔥 pic.twitter.com/REchc3MOLk
— Knight Vibe (@KKRiderx) February 20, 2024
रसेल सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-२०मध्ये रसेलने फलंदाजीने कहर केला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध रसेलने अवघ्या 29 चेंडूत 71 धावांची तुफानी खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 4 चौकार आणि 7 षटकार मारले गेले.