चालू वीजबिल न भरल्यास होऊ शकतो वीज पुरवठा खंडित…
अमरावती – महावितरणच्या अमरावती ग्रामीण विभागाअंतर्गत सहा तालुक्यातील ग्रामपंचायती अंतर्गत पाणी पुरवठा योजनांकडे वीजबिलाचे २८ कोटी थकले आहे.वीजबिल भरण्याला ग्रामपंचायतीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने महावितरणच्या कारवाईची दाट शक्यता निर्माण झाली आहे. महावितरणची वीज पुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी किमान चालू वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
महावितरण अमरावती ग्रामीण विभागाअंतर्गत अमरावती ,नांदगाव खंडेश्वर,चांदूर रेल्वे ,तिवसा,धामणगाव आणि भातकूली तालुक्यात ग्रामपंचायतीअंतर्गत ६८६ पाणी पुरवठा योजनांना महावितरणकडून वीज पुरवठा करण्यात येतो. पंरतू ग्रामपंचायत प्रशासनांकडून या योजनांचे वीज देयके न भरल्यामुळे वीजबिलाची थकबाकी २८ कोटी रूपये झाली आहे.
वीज पुरवठा खंडित केल्यानंतर पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही याची जाणीव ठेवत महावितरणकडून ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार तसेच प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा केल्यानंतर केवळ १४३ ग्रामपंचायतीने चालू वीज बिल भरण्याला प्रतिसाद दिला आहे. उर्वरीत ५४३ ग्रामपंचायतींनीही चालू वीज बिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
पाणी पुरवठा योजनांच्या विद्युत जोडणीचे वीज बिल प्रत्येक महिन्यात भरणे अपेक्षीत आहे. चालू वीजबिल न भरणाऱ्या पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित केल्या जात असून त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतींची असणार असल्याचे महावितरणने कळविले आहे.