पातुर – निशांत गवई
पातुर तालुक्यातील आलेगाव येथील लक्ष्मी संदीप तेलगोटे या महिलेने 9 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण प्रारंभ केले आहे. या महिलेच्या घराचा रस्ता काही लोकांनी बंद केलेला असल्याने हा रस्ता मिळावा यासाठी कडाक्याच्या थंडीत या महिलेने हे उपोषण सुरू केलेले आहे.
आलेगाव येथील लक्ष्मी तेलगोटे यांच्या घराला एकच रस्ता आहे. त्या रस्त्यावर काही लोकांनी अतिक्रमण करून तो रस्ता बंद केला. त्यामुळे त्यांच्या घराला कोणताही पर्यायी रस्ता उपलब्ध नाही. घरी जाण्या येण्यासाठी रस्ता मिळावा यासाठी लक्ष्मी तेलगोटे यांच्या सासरेबुवांनी दोन वेळा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. परंतु दोन्ही वेळा अधिकाऱ्यांकडून फक्त आश्वासने मिळाली. आश्वासनांची पूर्तता झाली नाही.
कोणतीही कारवाई झाली नाही आणि रस्ताही मिळालेला नाही. आतापर्यंत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, बिडिओ यांना निवेदने दिली. पण कोणीही त्यांना रस्ता मिळवून दिलेला नाही. त्यामुळे लक्ष्मी तेलगोटे यांनी नऊ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या घराला रस्ता मिळावा यासाठी आमरण उपोषण प्रारंभ केले आहे.
कडाक्याच्या थंडीत एका महिलेने आपल्या घराच्या रस्त्यासाठी आमरण उपोषण प्रारंभ करण्याची वेळ यावी याबाबत खंत व्यक्त केली जात आहे. ही समस्या जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर संबंधित अधिकारी आता कशा पद्धतीने हाताळतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. जिल्हाधिकारी या महिला असल्याने एका महिलेला न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.