Thursday, January 2, 2025
Homeराज्यआकोट | अतिक्रमणाचा दुसरा दिवस मावळला आठवडी बाजारात…काही भागातील अतिक्रमण हटविण्याची नागरिकांची...

आकोट | अतिक्रमणाचा दुसरा दिवस मावळला आठवडी बाजारात…काही भागातील अतिक्रमण हटविण्याची नागरिकांची स्वयंस्फूर्त मागणी…

आकोट- संजय आठवले

आकोट शहरात दुसरे दिवशीही अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. हा दुसरा दिवस पूर्णतः आठवडी बाजारातच घालविला गेला. भाजीपाला आडत्ये, फळे विक्रेता तसेच भंगार दुकानांचे अतिक्रमण येथून हटविण्यात आले. याच दरम्यान शहरातील अनेक भागातील त्रस्त नागरिकांनी आपल्या भागातील अतिक्रमणे काढण्याकरिता विविध निवेदने विविध अधिकाऱ्यांना सादर केलीत. त्यामुळे अतिक्रमण हटविणे बाबत नागरिकांमध्ये कमालीची जागरूकता निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.

पहिल्या दिवशी अतिक्रमण हटवणे बाबत धरसोड करण्यात आल्यानंतर दुसरे दिवशी हा अतिक्रमण तोडू ताफा आठवडी बाजारात घुसला. या ठिकाणी भाजीपाला व फळे आडत्यांची तसेच भंगाराची दुकाने थाटलेली होती. अतिक्रमण तोडू ताफा अगदी उंबरठ्यावर येईपर्यंतही या ठिकाणी कोणतीच हालचाल करण्यात आली नव्हती. मात्र हा तापात घटनास्थळी दाखल होताच सर्वच अतिक्रमणधारकांमध्ये धावपळ सुरू झाली. परंतु यावेळी अतिक्रमण हटाव मोहीम राबविणारे अधिकारी सामंजस्याच्या भूमिकेत दिसून आले. त्यांनी कोणताही आडमूठेपणा न करता अतिक्रमण धारकांना आपले अतिक्रमण काढण्याची मुभा दिली. त्यामुळे कुठेही काहीही कुरकुर न होता संपूर्ण दिवसभर शांततेने अतिक्रमण हटविण्यात आले.

या दरम्यान शहरातील काही भागातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आपल्या भागातील अतिक्रमण हटविण्याची अधिकाऱ्यांकडे मागणी केली. यामध्ये इफ्तेखार प्लॉटमधील नागरिकांनी उपविभागीय अधिकारी आणि पालिका मुख्याधिकारी यांना निवेदने दिली. त्यांनी अंजनगाव मार्गाजवळील बॉईज उर्दू हायस्कूल ते ईकरा शाळेपर्यंतच्या मार्गावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी केली. या भागातील हा मार्ग सर्वाधिक महत्त्वाचा मार्ग आहे. याच मार्गावरून या भागातील लहान थोर नागरिक, शाळकरी विद्यार्थी, मजूर, महिला, शेकडो दुचाकी, चार चाकी वाहने शहरात जाणेयेणे करतात. परंतु आजरोजी अतिक्रमणामुळे हा मार्ग अतिशय अरुंद झालेला आहे. हा मार्ग मोकळा करण्याची मागणी बरेच वर्षांपासून येथील नागरिक करीत आहेत. या संदर्भात त्यांनी पालिकेला अनेक निवेदनेही दिलेली आहेत. मात्र या भागातील एक टोलेजंग राजकीय नेता या निवेदनांना पालिकेतच मुठमाती देत आलेला आहे.

विशेष म्हणजे हा नेता भाजप कार्यकर्ता नसूनही आमदार भारसाखळे यांचेशी त्याचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे आताही हा नेता या निवेदनांना कारवाईत रूपांतरित न होणेकरिता प्रयत्न करणारच आहे. परंतु असे झाले तर आमदार भारसाखळे आणि मुख्याधिकारी या दोघांनाही अडचणीचे जाणार आहे. कारण येत्या शुक्रवार पर्यंत या निवेदनावर कार्यवाही न झाल्यास हे निवेदनकर्ते जिल्हाधिकारी निमा अरोरा यांना भेटून कार्यवाहीची मागणी करणार आहेत. त्यामुळे हा मार्ग अतिक्रमण मुक्त करणे आवश्यक झाले आहे. हे अतिक्रमण काढणे संदर्भातील निवेदनकर्त्यांना या नेत्याचा त्रास होऊ नये याकरिता या निवेदनकर्त्यांची नावे आणि फोटो महा व्हाईस प्रकाशित करू शकत नाही.

असेच एक निवेदन रामटेक पुरा भागातून थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आले आहे. या निवेदनात रामटेक पुरा ते आंबोडी वेस येथे जाण्या येण्यास अडचण होत असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे असेच निवेदन २०१३ मध्ये तहसीलदार आकोट यांच्याकडे देण्यात आले होते. त्यावर नायब तहसीलदार आकोट यांनी मुख्याधिकारी नगरपरिषद यांना हे अतिक्रमण काढणे बाबत सूचित केले होते. परंतु तब्बल नऊ वर्षे होऊन गेल्यावरही या निवेदनावर कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्याचा संदर्भ देऊन आता हे निवेदन पुन्हा जिल्हाधिकारी अकोला यांना देण्यात आले आहे. त्यामुळे या मोहिमेदरम्यान त्यावर कार्यवाही अपेक्षित आहे. या निवेदनकर्त्याचे नावही महा व्हाईस प्रकाशित करू शकत नाही.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: