आकोट – संजय आठवले
जन्मतः मतिमंद व विकलांग असलेल्या युवतीवर बलात्कार करणे व तिला धमकी देणे या अपराधापोटी ४५ वर्षीय इसमास आकोट न्यायालयाने दुहेरी जन्मठेप व एक लक्ष रुपये द्रव्य दंडाची शिक्षा ठोठावली आहे. गुन्हेगारांने द्रव दंड न भरल्यास त्याला अतिरिक्त कारावासाचीही शिक्षा सुनावण्यात आली आहे. यातील प्राधान्याच्या शिक्षा गुन्हेगाराने संयुक्तपणे तर वैकल्पिक कारावासाच्या शिक्षा एका नंतर एक अशा स्वतंत्रपणे भोगावयाच्या आहेत.
घटनेची हकिगत अशी कि, नमूद प्रकरणात पिडितेच्या आईने पोलीस ठाण्यात समक्ष येऊन जबानी कैफियत दिली कि, तिचा पती, दोन मुले व जन्मताच मतिमंद आणि विकलांग मुलीसह ती मोलमजुरी करून राहते. अशा स्थितीत पीडित युवतीला अचानक उलट्या होऊ लागल्या. त्यातच तिची मासिक पाळी ही बंद झालेली होती. म्हणून तिला दवाखान्यात नेण्यात आले. त्यावेळी केलेल्या वैद्यकीय चाचणीमध्ये पिडिता गर्भवती असल्याचे आढळून आले.
त्यावर तिला विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली. तेव्हा राजेश मनोहर पाठक हा पिडितेचे आई-वडील घरी नसताना घरी यायचा व तिचेवर बळजोरी करून लैंगिक अत्याचार करायचा अशी माहिती पिडिते दिली. अशा फिर्यादीवरून पोलिसांनी भादवी ३७६ (२) (एल), ३७६ (२) (एन) व ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणी आकोट शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांनी तपास करून प्रकरण न्याय प्रविष्ट केले.
प्रकरणात सरकारी पक्षातर्फे श्रीमती प्रार्थना भिमराव सहारे यांनी पीडितेची बाजू सक्षमपणे मांडली. युक्तिवाद करताना त्यांनी या प्रकरणांमध्ये तब्बल २२ साक्षीदार नोंदविले. त्यांनी आपल्या युतीवादात म्हटले कि, आरोपीचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असून त्याला शिक्षा देताना दया बुद्धी दाखविल्यास समाजात चुकीचा संदेश जाण्याची संभावना आहे. त्यावर आकोट जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी दोन्ही पक्षाचे युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपीवर गुन्हा साबित झाल्याचे सांगून आरोपीस दुहेरी जन्मठेपेची अर्थात नैसर्गिक जीवनाच्या अंतापावेतो सश्रम करावास आणि एक लक्ष रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
त्यासोबतच कलम ५०६ अन्वये पाच वर्षे कारावास आणि पाच हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम भरल्यानंतर ती पिडितेच्या हितासाठी वापरण्याकरिता तिचे मातापित्याचे संयुक्त बँक खात्यात जमा करण्यात येईल. याप्रकरणी पैरवी अधिकारी म्हणून पोहेकाॅं. प्रकाश वसंतराव जोशी यांनी सहकार्य केले.