रामटेक – राजु कापसे
नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील कान्द्री चेक पोस्ट परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागेहुन येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली यात कारमधील 4 जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि.11 ऑक्टोबर रोजी पहाटे 5.30 वाजताच्या सुमारास घडली असून हा अपघात रस्त्याच्या कडेला अवैधरित्या लावण्यात आलेल्या चहा-नाश्त्याच्या टपरीमुळे झाला असल्याचा आरोप करण्यात आला असून त्या दुकानाला हटविण्याची मागणी करण्यात आली आहे.
माहितीनुसार, नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील कान्द्री चेक पोस्ट परिसरात चहा-नाश्त्याची दुकाने असल्याने बरेचदा या परिसरात मोठमोठे ट्रक रस्त्याच्या कडेला उभे असल्याचे सांगितले जाते. अशाच स्थितीत ट्रक क्रमांक AP 05 TX 6399 रस्त्याच्या कडेला उभा असतांना जबलपूर कडून नागपूरच्या दिशेने येणाऱ्या आर्टिगा कार क्रमांक MP 35 CA 4102 हिने उभ्या ट्रकला मागेहुन जोरदार धडक दिली.
यात कारमध्ये असलेले मध्यप्रदेश दमू येथील रहिवासी मोसीन खान वय 35 वर्ष, फरजाण शकिर कुरेशी वय 20 वर्ष,नसीम करीम खान वय 50 वर्ष. व साहेन खान वय 40 वर्ष असे 4 जण गंभीर जखमी झाले असून कारचालक गाडी सोडून पसार झाला आहे.
घटनेची माहिती ओरिएंटल टोल प्लाझा खुमारी व पोलिसांना देण्यात आली. टोल प्लाझा खुमारी यांनी जखमींना उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे घेऊन गेले असता दोघांची स्थिती गंभीर असल्याने दोघांना नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात पाठविण्यात आले असून दोघांचा उपचार उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे सुरू आहे. रामटेक पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असून अधिक तपास रामटेक पोलीस करीत आहेत.
चहा-नाश्त्याची टपरी हटविण्याची मागणी.
कान्द्री चेक पोस्ट परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला अवैधपणे चहा-नाश्त्याची टपरी चालविण्यात येत असून या दुकानात चहा-नाश्त्यासाठी महामार्गाने जाणारे ट्रक निष्काळजीपणाने रस्त्याच्या कडेला उभी करतात.यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना त्रास तर होतोच मात्र एखादा अपघात घडल्यास अनेकांचे प्राण देखील जातात.
यासाठी या परिसरातील सर्व अवैधपणे लावण्यात आलेले चहा-नाश्त्याची दुकाने हटवून होणारे अपघात टाळण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी संबंधित विभागाला नागरिकांतर्फे करण्यात येत आहे.