पदवीधरांचे नेते शरद झांबरे पाटील यांचे सरकारकडे मागणी… जिल्हाधिकाऱ्यांना दिलं मागणीचे निवेदन…
अकोला – लवकरच होऊ घातलेल्या राज्यसेवा परीक्षेच्या पदांमध्ये वाढ करण्याची मागणी अकोला येथील पदवीधरांचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते शरद झांबरे पाटील यांनी सरकारकडे केली आहे. यासंदर्भात आपल्या मागणीचं निवेदन त्यांनी नुकतंच जिल्हाधिकारी निमा अरोरा यांना दिलं आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने यावर्षी घेण्यात येणारी राज्यसेवा परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा असणार आहे. वर्ष २०२० आणि २०२१ या मागच्या दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे शासकीय नोकरी भरती प्रक्रिया राबविण्यात अनेक अडचणी आल्यात. याचा फटका स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या अनेक राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना बसला. त्यातच आता वर्ष २०२३ पासून सरकारने राज्यसेवा परीक्षेच्या पद्धतीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे राज्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता नव्याने तयारी करावी लागणार आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचा जुन्या पद्धतीने परीक्षा देण्याचा हा शेवटचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे सध्या या परीक्षेसाठी सरकारनं मंजूर केलेल्या पदांच्या संख्येत वाढ करण्याची मागणी राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार राज्यसेवा परीक्षा २०२२ साठी २१ वेगवेगळ्या संवर्गातील ५०१ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती समाविष्ट पदांमध्ये शासनाच्या ११ संवर्गातल्या एकाही पदाचा समावेश नाही. या भरतीत समाविष्ट असलेल्या २१ संवर्गातील पदंही अतिशय कमी असल्याची तक्रार परीक्षार्थीनी केली आहे . यासंदर्भात शासनाकडून रिक्त असलेल्या पदांसंदर्भातील मागणीपत्र सादर न झाल्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कमी पदांची जाहिरात काढल्याची माहिती आहे.
शासनाकडून रिक्त असलेल्या पदांचं मागणीपत्रक सादर झालं तर या पदांची संख्या १००० पर्यंत जाऊ शकते. याचा फायदा राज्यातील लाखो परीक्षार्थी विद्यार्थ्यांना होऊ शकतो. कोरोना काळात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आधीच खूप मोठे नुकसान झालं आहे. त्यात पुढील वर्षापासून नवीन अभ्यासक्रमाने परीक्षा पद्धती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारा प्रस्तावित असल्याने विद्यार्थ्यांना त्याचाही फटका बसणार आहे.
त्यामुळे आता होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरतीतील पदांच्या संख्येत वाढ करण्याची मागणी पदवीधर नेते शरद झांबरे पाटील यांनी सरकारकडे केली आहे. सरकारने हा निर्णय घेतला तर राज्यातील लाखो परीक्षार्थी विद्यार्थी सरकारला निश्चितच धन्यवाद देतील, असेही त्यांनी या पत्रात सरकारला म्हटलेलं आहे. सरकार आपल्या मागणीचा निश्चितच संवेदनशीलपणे विचार करेल असा आशावादही यावेळी शरद झांबरे पाटील यांनी व्यक्त केला आहे.