राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आता तुरुंगातच दिवाळी साजरी करावी लागणार आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाने 100 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.भ्रष्टाचार आणि पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी देशमुख न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे. सदर प्रकरणाचा तपास CBI करीत आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोंदवलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात 4 ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर झाल्यानंतर देशमुख यांनी या प्रकरणात जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) नेत्याला 2 नोव्हेंबर 2021 रोजी अटक करण्यात आली.
देशमुख हे पूर्वीच्या महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये गृहमंत्री होते.या सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे भागीदार होते.देशमुख सध्या मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहेत.देशमुख यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले होते, परंतु मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिल्यानंतर त्यांना पायउतार व्हावे लागले.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि बडतर्फ केलेले पोलीस कर्मचारी सचिन वाझे यांनी ‘मिळवून’ घेतले आणि स्वत:च्या बचावासाठी त्यांच्यावर आरोप केले, असे म्हटले होते.गुरुवारी एका विशेष सीबीआय न्यायालयात केलेल्या अर्जात, राष्ट्रवादीच्या नेत्याने असा दावाही केला होता की, आपल्यावरील सर्व आरोप हे केवळ तपास यंत्रणांच्या “लहरी आणि कल्पनांवर” आधारित आहेत.