आकोट – संजय आठवले
आकोट शहरात आरा गिरण्या सुरू झाल्यापासून अव्याहतपणे सुरू असलेल्या या आरागिरण्यांबाबत गिरणी मालकाकडून काही आगळीक झाल्यास केवळ दंडात्मक कार्यवाहीवर त्याला सोडल्या जात असल्याची वहिवाट यावेळी मात्र आरा गिरणीला सिल ठोकून मोडीत काढण्यात आली आहे. वनविभागाच्या ह्या कार्यवाहीने अन्य आरा गिरणीधारकांमध्ये घबराट पसरली असून लाकूड कटाई परिसरात सध्या सन्नाटा पसरल्याचे दिसत आहे. परंतु अन्य आरा गिरणी धारकही धुतले तांदूळ नसल्याने या एकाच गिरणीवर कार्यवाही झाल्यामुळे ह्या कार्यवाही बाबत शंका कुशंका निर्माण होत आहेत.
आकोट शहरात एकूण १८ आरा गिरण्या आहेत. ह्या साऱ्या गिरण्या शहराच्या उत्तरेस एकाच ठिकाणी उभारण्यात आल्याने या ठिकाणी लाकूड कटाई बाजारच तयार झालेला आहे. त्यामुळे या ठिकाणी आरा गिरणी धारकांची एक संघटना ही स्थापित करण्यात आली आहे. या संघटनेच्या धाग्याने या आरा गिरणी धारकांचे वस्त्र चांगलेच घट्ट विणलेले आहे. त्यामुळे यातील कोणत्याही आरा गिरणीवर काही कार्यवाही झाल्यास त्याची वाच्यता बाहेर न होण्याची कसोशीने खबरदारी घेतली जाते. आजतागायत ह्या गिरणी मालकांवर केवळ दंडात्मक कार्यवाहीच झालेली आहे. मात्र यावेळी प्रथमच क्राऊन आरा गिरणीला सील ठोकण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.
ही कार्यवाही करण्याकरिता दस्तूरखुद्द अकोला वनविभागाचे उपवनसंरक्षक के. आर. अर्जुना यांनी १४ ऑक्टोबर रोजी आकोटात ठाण मांडले होते. प्रतिबंधित सागवान लाकडाची या गिरणीमध्ये अवैध कटाई होत असल्याच्या गुप्त माहितीवरून ही कार्यवाही करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र वन अधिकाऱ्यांनी या ठिकाणी छापा घातला असता तपासणीत सागवान लाकूड मात्र कुठेही आढळून आले नाही. उलट वनविभागाकडून मंजूर झालेल्या आडजात लाकडांची कटाई सुरू असल्याचे आढळून आले. मात्र कोणत्याही आरागिणीच्या शंभर मीटर परिसरात असलेले लाकूड त्याच आरा गिरणीचे मानले जाईल या नियमानुसार या गिरणीजवळ असलेल्या लाकडांचा साठा क्राउन आरा गिरणीचा असल्याचे गृहीत धरून या ठिकाणी वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला फिरत्या पथकाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी टाले यांनी हा गुन्हा दाखल केला. तर गिरणी सीलबंद करण्याची कार्यवाही वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एन.ओवे, वन परिमंडळ अधिकारी आर. टी.जगताप, वनरक्षक चंदू तायडे तथा वन कर्मचारी सोपान रेळे, विकास मोरे, दीपक मेसरे यांनी केली.
या संदर्भात अधिक माहिती घेतली असता कळले की, या ठिकाणी असलेल्या आरा गिरण्या अगदी एकमेकींना खेटून आहेत. त्यामुळे प्रत्येक आरागिणीचा शंभर मीटरचा परीघ मोजला असता अन्य दोन-चार गिरण्या सहजपणे अख्याच्या अख्या या परिघात येतात. त्यामुळे आरा गिरणी बाहेर पडलेला लाकूड फाटा नेमका कोणत्या गिरणीचा आहे, याचा अंदाज करणे कठीण आहे. त्यामुळे या आरा गिरणीवर कार्यवाही केल्यानंतर अन्य गिरण्यांचीही तपासणी होणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे अन्य आरा गिरणी धारकांना आपला अवैध लाकूड साठा दडवून ठेवण्यात यश आले. या पुढची माहिती अशी आहे की, १४ ऑक्टोबर रोजी दुपारी ही गिरणी सीलबंद केल्यावर त्याच रात्री दुसऱ्या एका आरा गिरणीमध्ये येऊन वनकर्मचाऱ्यांनी या गिरणीमधील लाकूड फाट्यावर वैधता शिक्के मारले. परंतु याची कूणकूण लागल्याने अकोला येथील एका वन अधिकाऱ्याने नव्याने मारलेल्या या शिक्क्यांचे फोटो दुसऱ्या दिवशी काढून वरिष्ठांना सादर केले आहेत.
या गुंतागुंतीच्या खेळात आणखी असेही कळले की, या प्रत्येक आरा गिरणी मालकांकडून प्रतिमाह १० हजार रुपये प्रमाणे दर साल १ लक्ष २० हजार रुपये गोळा केले जातात. आणि या रकमेतून महसूल अधिकारी, वन अधिकारी, काही पत्रकार यांना नियमित नजराणा पेश केल्या जातो. धक्कादायक माहिती अशी आहे की, १४ ऑक्टोबर रोजी क्राउन आरा गिरणीवर गुन्हा दाखल करणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकारी टाले यांचे नावावर प्रति गिरणी २ हजार रुपये गोळा केले गेले. मजेदार बाब म्हणजे हे सारे दान एका विशिष्ट ईसमाकडे गोळा केले जाते. त्यानंतर या इसमाने त्या दानाचा काय विनियोग केला हे ना दानदाता विचारतो ना त्याचा हिशेब दानसंकलनकर्ता देतो. त्यामुळे हे गुप्तदान सत्पात्री जाते की कूपात्री जाते याचा कुणालाच थांगपत्ता नसतो. परंतु या दानाच्या जोरावरच या ठिकाणी आजवर कोणतीही गंभीर कार्यवाही न होता, केवळ दंडात्मक कार्यवाहीवरच भागवले जात आले आहे. मात्र यावेळी सीलबंद कार्यवाही झाल्याने सध्या लाकूड कटाई बाजार सुन्न पडला आहे.