नांदेड – महेंद्र गायकवाड
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कन्हैया कदम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष फैसल सिद्धीकी व त्यांच्या सहकार्यांनी आज जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन शिक्षण हक्क कायद्यानुसार 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे, परंतु राज्य सरकारच्यावतीने 20 पेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे राज्यभरातील शाळा बंद झाल्यास लाखो गोर, गरीब, वंचित, बहुजन व शेतकर्यांची मुले आणि खासकरून मुली शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जातील.अशा बहुतांश शाळा या दुर्गम भागात व वाहतुकीच्या सोयीसुविधा नसलेल्या ठिकाणी आहेत. अशावेळी या शाळा बंद झाल्यास येथे शिकणारे हे लाखो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होतील. त्यामुळे बालमजुरी, बालविवाह, गुन्हेगारी अशा सामाजिक समस्या यातून निर्माण होण्याची शक्यता आहे.
तसेच मराठी शाळांचा दर्जा व विश्वासार्हता टिकविण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे, इंग्रजी शाळांचे वाढते आकर्षण हेही पटसंख्या कमी होण्याचे मुख्य कारण आहे. त्यासाठी शासनाने बंद करण्याचा निर्णय घेतलेल्या शाळा इंग्रजी माध्यमातून सुरू कराव्यात, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शालेय शिक्षणमंत्री यांना देण्यात आले. जर शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष फैसल सिद्धीकी, रोहित पवार, महंमद अरसलान, अमितसिंघ सुखमनी, अभिषेक शिंदे, युसूफ अंसारी, जयते वानखेडे, माधव डाकोरे, तुषार कल्याणकर, साई उबाळे, योगेश शिंदे, सुमीत साबळे, निखिल हटकर, रितेश पाटील आदी उपस्थित होते.