सा. बां. विभागाची कारवाई सुरू…गोपाळखेडचा नवीन पूल सुरू करण्याची मागणी…
आकोट – संजय आठवले
तब्बल 95 वर्षांचे वय असलेल्या आकोट अकोला मार्गाच्या गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरील इंग्रज कालीन पुलास तडा गेला असून या पुलाच्या आकोटकडील बाजूचा चौथा गाळा दहा ते पंधरा इंचांनी जमिनीत धसल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या कारवाईस प्रारंभ केला आहे. परंतु या प्रक्रियेस प्रदीर्घ कालावधी लागणार असल्याने गोपाळखेड नजीक याच नदीवर बांधलेला पूल वाहतुकीस मोकळा करण्याची जोरदार मागणी होत आहे.
अकोला येथून आकोट मार्गे थेट मध्य प्रदेशात जाणाऱ्या महामार्गाचे महत्त्व ओळखून इंग्रज राजवटीत १९२७ साली गांधीग्राम येथील पूर्णा नदीवर पुलाचे निर्माण करण्यात आले होते. १९ जुलै १९२७ रोजी मॉंन्टेग्यू बटलर या ब्रिटिश अधिकाऱ्याची हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात आले होते. तेव्हापासून अकोला, आकोट ते थेट मध्य प्रदेशापर्यंतची वाहतूक करणारी हजारो वाहने या पुलावरून दररोज जात येत असतात. हा पुल जमिनीपासून ३५ फूट उंच असून २० फूट रुंद व २५५ फूट लांबीचा आहे.
या पुलाला ८ गाळे असून प्रत्येक गाळ्यातील अंतर २० फुटांचे आहे. आज रोजी या पुलाचे वय तब्बल ९५ वर्षांचे आहे. अशा स्थितीत हा पुल आता जीर्णावस्थेत आला आहे. नुकत्याच झालेल्या कोसळधार पावसाने या जीर्णावस्थेत अधिकच भर घातली आहे. परिणामी आकोटकडील बाजूच्या चौथ्या गाळ्याची आधार भिंत अंदाजे १० ते १५ इंच जमिनीत घूसली आहे. त्यामुळे या चौथ्या गाळ्याच्या आतील बाजूने या पुलास तडा गेला आहे.
पुलाच्या एका बाजूच्या प्रारंभापासून दुसऱ्या बाजूच्या अंतापर्यंत हा तडा असल्याने या पुलावरून अवजड वाहने नेणे अतिशय धोकादायक झाले आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतुकीस पूर्णतः बंद करण्यात आले आहे.या दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाची तपासणी सुरू केली आहे. या तपासणीत ह्या तड्याची गंभीरता तथा गाळ्याच्या भिंतीचे जमिनीत घुसण्याचे प्रमाण निश्चित केले जाणार आहे.
सोबतच या तड्यामध्ये आणि भिंत जमिनीत घुसण्याचे प्रमाणामध्ये रोज होणारे बदल यांचा जवळपास पंधरा दिवस अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतर याबाबत काय उपाययोजना करावयाची आहे? याचा निर्णय घेतला जाणार आहे. ज्याप्रमाणे एखाद्या गंभीर रुग्णास आपल्या निगराणी खाली ठेवून डॉक्टर त्या रुग्णाचे प्रकृतीत होणारे बदल पाहून योग्य तो उपचार करतो. नेमक्या त्याच पद्धतीने या पुलाची तपासणी करण्यात येणार असल्याचे सा. बां. अधिकाऱ्यांनी सांगितले.
परंतु या प्रकरणी काहीही निर्णय झाला तरी, या प्रक्रियेस प्रदीर्घ कालावधी लागणार आहे. त्यासाठी गांधीग्राम पासून जवळच असलेल्या गोपाळखेड येथे याच नदीवर बांधण्यात आलेला नविन पूल वाहतुकीस मोकळा करण्याची मागणी होत आहे. या संदर्भात माहिती आहे की, गांधीग्रामच्या या पुलाचे वय झाल्याने तो कधीही कोसळू शकतो, अशी सूचना ब्रिटिश सरकारने काही वर्षांपूर्वीच महाराष्ट्र शासनाला दिली होती. त्यासाठी कायमस्वरूपी दुसरी व्यवस्था करणे करीता शासनाने गोपाळखेड येथील पुलाचे निर्माण केले आहे.
तब्बल १० करोड ५६ लक्ष रुपये खर्चून हा पूल सन २०१८ मध्ये पूर्ण करण्यात आला आहे. परंतु हा पूल उभारताना सा. बां. विभागाने “कामाचा ना काजाचा, दुश्मन साऱ्या जगाचा” अशी ह्या पुलाची अवस्था केली आहे. वास्तविक हा पूल उभा करताना या पुलावरून जाणारा मार्ग दोन्ही बाजूंनी मुख्यमार्गांशी जोडण्यासाठी आवश्यक असणारी जमीन अधिग्रहित करणे आवश्यक होते. त्यानंतरच हा पूल बांधावयास हवा होता. मात्र सद्यस्थितीत पूल बांधून चार वर्षे झाली आहेत.
परंतु या मार्गाकरिता जमिनीचे अधिग्रहण करण्यात आलेले नाही. यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, या मार्गासाठी काही शेतकऱ्यांनी आपली जमीन शासनास दिली आहे. मात्र काही शेतकऱ्यांनी योग्य मुआवजा दिला जात नसल्याचा मुद्दा थेट न्यायालयात नेला आहे. परिणामी जमीन अधिग्रहणाचे काम रेंगाळलेले आहे. त्यामुळे रस्ताच नसताना सा. बां. विभागाने हा पूल का बांधला? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
गत ४ वर्षात यावर तोडगा काढला गेला असता तर, आज रोजी हा पूल वाहतुकीस मोकळा झाला असता. आता गांधीग्रामच्या पुलाने हाय खाली आहे. त्याने तो केव्हाही धराशाई होऊ शकतो. अशा अवस्थेत गोपाळखेडच्या या पुलाच्या मार्गाकरिता अतिशय जलद गतीने जमीन अधिग्रहण करून हा मार्ग व पूल वाहतुकीस मोकळा करणे ही काळाची गरज आहे.