राज्यातील अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विशेष शाळांसह सर्वच शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा ऑक्टोंबर पेड इन नोव्हेंबरचा पगार थकबाकी व महागाई भत्त्यासह दिवाळी सणापुर्वी होणे बाबत संबंधीतांना आदेश देण्यात यावे ही मागणी अकोल्यातील शरद झामरे पाटील यांनी अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांना निवेदनाद्वारे केली होती. आता त्यांच्या मागणीला यश आल्याचे दिसत असून याबाबत राज्यशासनाने परिपत्रक २१ ऑक्टोबर २०२२ रोजी देण्यात यावे असे निर्देश दिले आहे.
दिवाळी सणाची सुरुवात यावर्षी दि. २२ ऑक्टोबर २०२२ पासून होत आहे. राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक यांना दिवाळी सण साजरा करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये याउद्देशाने माहे ऑक्टोबर २०२२ चे माहे नोव्हेंबर २०२२ मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन दिवाळी सणापूर्वी प्रदान करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
२. उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयातील परिच्छेद १ (८) मधील तरतूद शिथील करुन माहे ऑक्टोबर, २०२२ या महिन्याचे वेतन आणि निवृत्तीवेतनाचे प्रदान दि. २१ ऑक्टोबर २०२२ रोजी करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
३. यादृष्टीने मुंबई वित्तीय नियम, १९५९ मधील नियम ७१ च्या तरतुदी तसेच महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ च्या खंड १ मधील नियम क्र. ३२८ मधील तरतुदी देखील शिथिल करण्यात येत आहेत.
४. वेतन देयकाचे प्रदान विहित कालावधीत होण्यासाठी सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी वेतन देयके त्वरीत कोषागारात सादर करावीत.
५. सदर तरतूदी जिल्हा परिषद, मान्यताप्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे / अकृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी / कर्मचारी, तसेच निवृतवेतनधारक यांना देखील लागू होतील.
६. संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी अधिदान व लेखा कार्यालय तसेच राज्यातील सर्व कोषागारे व उपकोषागारे यांना आवश्यक त्या सूचना तात्काळ निर्गमित कराव्यात. असे परिपत्रक राज्य शासनाकडून देण्यात आले आहे.