आकोट – संजय आठवले
न्यायालयाचे आदेशाने अकोला जिल्ह्याच्या आकोट व बाळापुर तालुक्यामधील आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्यानंतर दिनांक २० ऑक्टोबर रोजी या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांची निवड होणार असून नवनिर्वाचित सरपंच या सभेच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. तर निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याकरिता प्रशासकीय अधिकारी निवडणूक निरीक्षक म्हणून राहणार आहेत.
कमी पर्जन्यमान असलेल्या तालुक्यांमधील ग्रामपंचायतच्या निवडणुका त्वरित घेण्याचे आदेश न्यायालयाने निवडणूक आयोगास दिले होते. त्यानुसार अकोला जिल्ह्याच्या आकोट तालुक्यातील सात व बाळापूर तालुक्यातील एक ग्रामपंचायत यांची निवडणूक घेण्यात आली होती.
या ठिकाणी शासकीय धोरणानुसार सरपंचांची निवड थेट जनतेतून करण्यात आली होती. या प्रक्रियेनंतर आता या नवनिर्वाचित ग्रामपंचायतींच्या उपसरपंच पदांकरिता दिनांक २० ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे. नियमानुसार उपसरपंच पदाच्या निवडणुकीकरिता होणाऱ्या नवीन ग्रामपंचायत कार्यकारिणीच्या ह्या प्रथम सभेच्या अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित सरपंच राहणार आहेत. ही निवडणूक प्रशासकीय दृष्ट्या सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.
या नियुक्ती आदेशानुसार आकोट तालुक्यातील गुलरघाट येथे विठ्ठल थुल, कृषी अधिकारी पंचायत समिती आकोट, अमोना येथे राहुल वठे प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास प्रकल्प आकोट, धारगड येथे सुशांत शिंदे तालुका कृषी अधिकारी आकोट, पोपटखेड येथे रवींद्र यन्नावार नायब तहसीलदार आकोट, कासोद व शिरपूर येथे सोहनलाल पालवे, उपअधीक्षक भूमि अभिलेख आकोट,
धारूर येथे गजानन सावरकर गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती आकोट आणि बाळापूर तालुक्यातील व्याळा येथे संदीप आगळे विस्तार अधिकारी पंचायत समिती बाळापुर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडल्यानंतर या संदर्भातील अहवाल स्थानिक तहसीलदार यांचे मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांना सादर करावा लागणार आहे.