सांगली – ज्योती मोरे
गेल्या सव्वा महिन्यापासून काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी सुरू केलेली भारत जोडो पदयात्रा मोठ्या उत्साहात आणि लोकांच्या उदंड प्रतिसादात पार पडत आहे .हि पदयात्रा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात येणार आहे.
महाराष्ट्रातील नांदेड, हिंगोली ,बुलढाणा, यवतमाळ ,नाशिक तसेच जळगांव जिल्ह्यामध्ये ही पदयात्रा संपन्न होणार आहे.या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी सांगली जिल्ह्यातून हजारो काँग्रेस कार्यकर्ते जाणार आहेत .अशी माहिती माजी कृषी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजीत कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
त्याच बरोबर सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिकेच्या वतीने सिव्हील हॉस्पिटल चौकाला स्वर्गीय पतंगराव कदम यांचे नाव देण्यात आले आहे. सदर नामफलकाचे अनावरण जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत 16 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे.
जिल्ह्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी ,आमदार, खासदार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचेही माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी सांगितले आहे. यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील , सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील ,ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत,सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील, युवा नेते जितेश भैया कदम आदी मान्यवर उपस्थित होते.