अमरावती – श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित तक्षशिला महाविद्यालय अमरावती विज्ञान विभागांतर्गत येणाऱ्या प्राणीशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी 4 ऑक्टोबर 2022 रोजी ‘वसा ऑर्गनायझेशन’ येथे जागतिक प्राणी दिवसाच्या निमित्ताने भेट देऊन ‘जागतिक प्राणी’ दिवस उत्साहाने साजरा केला.
‘वसा’ चे संस्थापक शुभम सायंके यांनी मुलांना ‘वसा ऍनिमल रेस्क्यू सेंटर’ विषयी माहिती दिली. मुलांशी संवाद साधून मुलांना प्राणी संवर्धनाचे महत्त्व समजावून सांगितले व पटवून दिले. त्यांनी सांगितले की जखमी अवस्थेत प्राणी रेस्क्यू सेंटरमध्ये कसे आणल्या जातात व तिथे त्यांच्यावर उपचार करून त्यांना जीवनदान दिले जाते. पुढे त्यांनी सांगितले की प्राण्यांना बोलता जरी येत नसले तरी त्यांना सुद्धा भावना असतात. आपल्यासारखेच तेही एक जीव आहे.
निसर्गाचा एक भाग आहेत. त्यांचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे. यावेळी रेस्क्यू सेंटर मध्ये जखमी अवस्थेत असलेल्या श्वानांची, पक्षांची, मांजरांची माहिती त्यांनी मुलांना दिली. त्यांनी मुलांना सांगितले प्राणी गाड्यांखाली येतात त्यांचा अपघात होतो आणि अशाप्रकारे जखमी प्राण्यांची माहिती हेल्पलाइन नंबर द्वारा रेस्क्यू सेंटर ला दिली जाते. रेस्क्यू सेंटर मधले वॉलेंटियर्स त्यांना सेंटरमध्ये घेऊन येतात आणि तिथे त्यांच्यावर योग्य तो उपचार केला जातो.
जोपर्यंत ते प्राणी पूर्णपणे बरे होत नाही तोपर्यंत त्यांना तिथेच ठेवून घेतले जाते. यानंतर त्यांनी मुलांना सांगितले की तुम्ही वॉलेंटियर म्हणून एक दिवस तरी आपली सेवा सेंटरमध्ये देऊ शकता. मुलांना संदेश देताना ते म्हणाले की तुम्ही आपल्या प्रियजनांचे वाढदिवस तिथे प्राण्यांसाठी अन्नदान करून सुद्धा साजरे करू शकता.
यानंतर मुलांनी स्वतः तयार करून आणलेले बर्ड फीडर्स सेंटरला भेट म्हणून दिले आणि आपली एक आठवण म्हणून रेस्क्यू सेंटरच्या परिसरात वृक्षारोपणही केले. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक अनिकेत माथने, अमोल मोरे, कोमल मनोहरे आणि पूजा म्हाला यांनी ‘वसा ऑर्गनायझेशन’ अमरावती संस्थेचे संस्थापक शुभम सायंके यांचे अगदी मनःपूर्वक आभार मानले, तसेच त्यांचे हे कार्य असेच अविरत चालू राहो अशा शुभेच्छाही दिल्या.