अमोल साबळे
गुरुकुंज मोझरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराची संपूर्ण देशाला गरज आहे राष्ट्रसंत हे फक्त महाराष्ट्र पुरते नाही तर जागतिक पातळीवरील वैचारिक नेते होते, असे प्रतिपादन वॉशिंग्टन येथील विल हैरिस यांनी केले.
अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी गावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव सुरू आहे. या पुण्यतिथी महोत्सवामध्ये विदेशातील वीस पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी अमेरिका, जर्मनी, कॅनडा या देशातील सर्व पाहुण्यांनी तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचे दर्शन घेऊन ते राष्ट्रसंतांपुढे नतमस्तक झाले.
दरम्यान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५४ व्या पुण्यतिथी महोत्सवात शुक्रवारी पाच लाखांवर भाविक साश्रू नयनांनी श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. गुरुकुंजात दोन दिवसांपासून भाविकांचे जत्थेच्या जत्थे पालखीने दाखल होत आहेत. गुरुकुंज व मोझरी ही जुळी गावे भाविकांचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाली आहेत.
गुरुकुंजातील पुण्यतिथी महोत्सवातील लगबग शुक्रवारी दुपारी ४ वाजून ५८ मिनिटांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी स्तब्ध होणार आहे. महाद्वारावरील विशालकाय घंटेचा निनाद झाल्यावर महासमाधीच्या दिशेने भाविक जेथे असेल तेथे दोन मिनिटे थांबून हात जोडून मौन श्रद्धांजली अर्पण करतील. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकसुद्धा थबकणार आहे. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.३० वाजता ध्वजारोहणानंतर गावोगावाहून आलेल्या दिंड्यांची ग्रामप्रदक्षिणा व गोपालकाल्याचे आयोजन करण्यात आले आहे.