रामटेक – प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवन काळाविषयी देशात जे महत्त्वपूर्ण स्थळे आहेत त्यांच्यापैकीच रामटेक हे सुद्धा एक अनन्यसाधारण महत्त्व असलेले स्थळ आहे.प्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामनगरी रामटेक येथे दरवर्षी विजयादशमी दसरा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो.
कोरोनामुळे मागील दोन-तीन वर्षात या सणाच्या उत्साहात विरजन आले होते.मात्र कोरोना प्रादुर्भाव सध्या संपल्यागत असल्याने यावर्षी रामटेक येथे दसरा जबरदस्त उत्साहाने साजरा करण्यात आला.
रामटेक जवळील राखी तलावाशेजारी असलेल्या मैदानात हजारो-लाखो नागरिकांच्या उपस्थितीत रामटेकच्या उपविभागीय अधिकारी श्रीमती वंदना सवरंगपते,तहसीलदार बाळासाहेब मस्के,रामटेकचे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी आकर्षक वेशभूषेनी सजलेल्या रामभक्तांद्वारे रावणाच्या पुतळ्याचे वध करण्यात आले.
संपूर्ण देशात अयोध्या आणि रामटेक या प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवनलीलेशी संबंधित दोन स्थळात रावणाच्या पुतळ्याचे दहन न होता त्याचे वध केले जाते.या दृष्टीने रामटेक येथील दसरा उत्सव विशेष ठरतो.याप्रसंगी उपस्थित उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते,तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी प्रतिनिधीकडे नागरिकांना दसऱ्याच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. आयोजन शांततेत पार पाडले जावे म्हणून पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात रामटेक पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.