आकोट- संजय आठवले
आकोट – १२/१३ लक्ष रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक्स साहित्याच्या अपहार प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या आकोट बाजार समिती सचिव यांना अखेर आकोट न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. चार दिवसांच्या या पोलीस कोठडी तपासात नेमके काय निष्पन्न झाले याची माहिती मिळू शकली नाही.
राज्य शासनाने राज्यातील सर्वच बाजार समित्यांना विविध इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे वापराकरिता दिली होती. त्यातील काही उपकरणे तत्कालीन बाजार समिती सचिव यांनी गहाळ केल्याची तक्रार मुख्य प्रशासकांनी दिली होती. त्या अनुषंगाने आकोट पोलिसांनी तत्कालीन सचिव राजकुमार माळवे यांना अटक केली होती. अटकेनंतर आकोट न्यायालयाने त्यांना आधी एक व नंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
न्यायालयीन सुनावणी दरम्यान आरोपीकडून गहाळ साहित्य आणि त्या संदर्भातील कागदपत्रे जप्त करावयाचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. त्यावर आपण सर्वच गहाळ साहित्याचा तपशील दिल्याचा आरोपी पक्षाचा दावा होता. परंतु या संदर्भात बाजार समितीमध्ये कोणतेच दस्त उपलब्ध नसल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. तर ते सारे दस्त बाजार समिती कार्यालयातच उपलब्ध असून प्रशासक मंडळ ते दस्त पडताळणी करिता देत नसल्याचा आरोपी पक्षाचा युक्तिवाद होता. या आहे रे….. नाही रे….. च्या वादंगात आकोट पोलिसांनी नेमके काय काय जप्त केले, याचा तपशील मिळू शकलेला नाही. परंतु बरेच साहित्य पोलिसांनी मिळविले असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे अखेरीस आकोट न्यायालयाने सचिव राजकुमार माळवे यांची जामीनावर सुटका केली आहे.
या सुटकेने सचिव आणि प्रशासक मंडळ यांचे दरम्यान सुरू असलेल्या नाटकाचा प्रथम अंक समाप्त झाला आहे. मात्र या नाट्याच्या दुसऱ्या अंकाचा पडदा उघडल्यावर बाजार समितीच्या मंचावर बऱ्याच गतीविधींचा उहापोह होण्याची शक्यता आहे. प्रशासक मंडळांनी चढविलेला अटकेचा हल्ला परतवून लावल्यानंतर आता सचिव राजकुमार माळवे यांच्या भूमिकेकडे साऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.