सांगली – ज्योती मोरे
अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र तपासणी समितीच्या वादग्रस्त कारभाराची चौकशी करण्यात यावी, अधीसंख्य सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्वरित पेन्शन लागू करण्यात यावी, ग्रॅज्युएटी आणि इतर लाभ देण्यात यावेत, मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना पेन्शन व इतर लाभ देण्यात यावेत, कुटुंबातील एका व्यक्तीस अनुकंपा तत्वानुसार नोकरीत सामावून घेण्यात यावं,
शासन निर्णय दिनांक 21/ 12 /2019 मधील 4.2 नुसार सेवा समाप्त कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेऊन त्यांना सेवा सातत्य देऊन वार्षिक वेतन वाढीसह महागाई भत्ता व इतर सेवा विषयक लाभ देण्यात यावेत, यासह महाराष्ट्र शासनाने अशा कर्मचाऱ्यांना विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या सर्व याचिका परत घ्याव्यात यासह इतर मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ह्युमन महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने बेमुदत उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे.
दरम्यान या मागण्या संदर्भात योग्य तो निर्णय न घेतल्यास पुढील काळात याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवृत्त कर्मचारी विलासराव मस्के यांनी संघटनेच्या वतीने दिला आहे. यावेळी पांडुरंग पाटील, अशोक राजमाने, दिलीप पाटील, संभाजी पाटील, मोहन पाटील, स्वप्निल मस्के, हनुमंत पंढरे आदींसह इतर निवृत्त कर्मचारी उपस्थित होते.