कोल्हापूर – राजेद्र ढाले
भाजी विक्रेत्या बापाने मुलीच्या स्मृतीदिनी 1000 वृक्षारोपण, गडमुडशिंगीतील रानगे कुटुंबियांचे आदर्शवत उपक्रम…
आपल्या मुलीच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे कृष्णात शामराव रानगे यांनी पंचवीस हजार रुपयांच्या १००० फळ झाडांचे वृक्षारोपण करून मुलीच्या स्मृति चिरकाल टिकण्यासाठी पर्यावरणा प्रति जनजागृती करीत वेगळा आदर्श घालून दिला.
विशेष म्हणजे कृष्णात लांडगे हे माजी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या आठवीत शिकणाऱ्या मुलीचे अपघाती निधन झाले. सर्वांची लाडकी असलेली शैलजा ला लहानपणापासूनच निसर्गातील झाडे, फुले, पक्षी, फळे व वन्यजीव याविषयी विशेष ओढ होती. परंतु नियतीने अचानक घाला घालीत शैलाजाची इहलोकीची यात्रा संपविली होती.
निसर्ग प्रेमाप्रती एक आठवण म्हणुन तिच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त रानगे कुटुंबीयांनी गावातील नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमंडळी यांना एक हजारहून अधिक फळझाडांची रोपे वाटप करीत वेगळ्या पद्धतीने स्मृतिदिन साजरा केला. तसेच या फळझाडांचे संगोपन करण्याची विनंती देखील त्यांनी यावेळी केले. यामध्ये आंबा, चिकू, पेरू, सीताफळ, जांभूळ, चिंच या जातींच्या झाडांच्या रोपांचे वाटप करण्यात आले.
आरोग्याच्या दृष्टीने फळांचे महत्त्व अनन्यसाधारण असून , त्यामुळे फळ रोपे वाटप केलेल्या घरांमध्ये आरोग्य नांदेल तसेच या झाडांमुळे लाडक्या शैलाच्या स्मृती चिरकाल टिकतील या उदात्त हेतूने फारशी शैक्षणिक पार्श्वभूमी नसतानाही रानगे कुटुंबीयांनी एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. नवरत्न चौक ,प्राथमिक शाळा आणि न्यू इंग्लिश स्कूल या ठिकाणी रोपे वाटप करण्यात आली.
त्यांच्या या रोप वाटपाच्या कार्याचे कौतुक परिसरामध्ये होत आहे. यावेळी उप सरपंच तानाजी पाटील , सुधाकर पाटील ,रासपचे कृष्णात रेवडे, , दत्तात्रय नेर्ले,बाबासाहेब रानगे,रणजित राशिवडे ,आप्पासाहेब धनवडे , दत्तात्रय शेळके, तानाजी जाधव, स्वप्नील बनकर,करसिद्ध खिल्लारी आदी उपस्थित होते. आभार महादेव वाघमोडे यांनी व्यक्त केले.
रानगे कुटुंबीयांचा मुख्य व्यवसाय शेती व भाजीपाला विक्री असून मुलीचे आजी, आजोबा अशिक्षित तर वडील कृष्णात यांचेही शिक्षण आठवीपर्यंत झाले आहे तरीही पर्यावरण विषयक जाणीव आणि जागृती विशेष कौतुकास्पद आहे.
गडमुडशिंगी येथे रानगे कुटुंबियांकडून मुलीच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त फळ झाडांचे वाटप उपसरपंच तानाजी पाटील, माजी सरपंच आप्पासाहेब धनवडे, सुधाकर पाटील, अरुण शिरगावे व इतर