Monday, November 25, 2024
Homeमनोरंजनप्रतिभेचे प्रज्ञावंत व्यक्तिमत्व अनिलराज रोकडे…

प्रतिभेचे प्रज्ञावंत व्यक्तिमत्व अनिलराज रोकडे…

मुंबई – गणेश तळेकर

मराठवाड्यांतील औरंगाबाद जिल्ह्यांतील ‘सोयगाव’या छोट्याशा दुर्गम भागांतील गावांत अनिलराज रोकडे यांचा जन्म झाला. वडील श्री. रामदास रोकडे शेती करायचें. चिमुकला अनिलराज जिल्हा परिषदेच्या शाळेंत जायचा. शाळेंत बाराखडी प्रामाणिकपणे गिरवायचा आणि शाळेचा अभ्यास आटोपला की, गुरे राखायला जायचा.संत्र्याच्या बागेला पाणी घालायचा व शेतीची छोटी मोठी कामें करायचा.

सगळीं मुलें जेव्हा इसापनीतीतील कथा वाचण्यांत गुंग असत, तेव्हा अनिलराज थोरामोठ्यांच्या कथा व चरित्र वाचण्यांत रमलेला असायचा. दहावीत असतांना शाळेतून निघणाऱ्या ‘सातमाळा’या वार्षिक अंकात कविता,स्फुटक लिहायला त्याने सुरुवात केली. आणि त्याचं लिखाण वाचल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी भविष्यवाणीं केली की ,हा मुलगा मोठेपणीं नक्कीच साहित्य सेवेचा वसा जपेल.

शालांत परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी ‘संत ज्ञानेश्वर ‘महाविद्यालयांत वाणिज्य शाखेत प्रवेश केला .याच काळांत पत्रलेखनाच्या माध्यमांतून त्यांनी वेगवेगळ्या वृत्तपत्रांतून वेगवेगळ्या समस्यांना वाचा फोडण्याचें काम निर्भीडपणें करायला सुरुवात केलीं. ते बारावीत असताना त्यांना ‘लोकमत’ या विदर्भ, मराठवाडा व खानदेश मध्ये प्रसिद्ध असलेल्या वृत्तपत्रांत वार्ताहर म्हणून काम करायची संधी मिळालीं.

यात त्यांनी गरीब शेतकऱ्यांच्या समस्या, पोलीसी भ्रष्टाचार यावर प्रकाशझोत टाकला .शेतकऱ्यांना तगाई कर्जे, रब्बी खरीप पिकासाठीचें अनुदान, पणन महासंघातील अखत्यारीतील कापूस एकाधिकार, खरेदी केंद्रातील कापसाचा दर्जा ठरवितांना, दर्जा अधिकाऱ्यांकडून होणारा भ्रष्टाचार अशा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर अगदी छोट्या अनिलराज यांनी आवाज उठवला.

सोयगाव तालुका औरंगाबाद व जळगांव विभागांत आपली पत्रकारिता प्रभावीपणें केल्यानंतर त्यांनी शिक्षणासाठीं मुंबई गाठली आणि ‘मुंबई तरुण भारत’ या सायंदैनिकात वार्ताहर म्हणून काम करायला सुरुवात केली. या सुमारास ‘सामना ‘वृत्तपत्र सुरू झालं. तेथील कार्यकारी संपादक अशोक पडबिंद्रिंशी त्यांची पूर्वीची ओळख असल्यामुळें त्यांनी वार्ताहर म्हणून तेथेही काम करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान अनिलराज रोकडे यांनी ,’सामना वसई विशेषांकाचे’ संपादन केले आणि स्वतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यांची कौतुकानें पाठ थोपटून शाबासकीही दिली होती.

तरुण भारत व सामना या दोन वृत्तपत्रांत वार्ताहर म्हणून काम करत असतानाच त्यांनी ‘महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत’ नोकरी पत्करली आणि लोकसत्ता वृत्तपत्रांत वार्ताहर म्हणून कामास सुरुवात केली. १३वीत असताना अनिलराज यांनी पहिली बातमी लिहिली आणि तेंव्हापासून वार्ताहर म्हणून त्यांचा प्रवास आजतागायत चालूच आहे.आता गेल्या पाच वर्षांपासून दैनिक पुढारी, दैनिक नवशक्ती या दोन दैनिकांसाठी ते पत्रकारिता करीत आहेत.

अगदी लहानपणांपासूनच त्यांचे लेखनाशी, कवितेशी नातं होतं. त्यांचं भाषाप्रभुत्व जबरदस्त होतं आणि मुख्य म्हणजे कवी आणि चारोळीकार चंद्रशेखर गोखले त्यांचे आवडते कवी होते. आणि त्यांनीही कवितेचा वसा प्रेमाने जपलेला आहे. ते शीघ्र कवीही आहेत. ‘चालेल ज्याची जितकी जो तो चालवीत असतो…

आपापल्या विश्वाचा काजवाही सूर्य असतो!’ ही चारोळीचं याचं प्रमाण आहे. आमदार व ज्येष्ठ गीतकार शांताराम नांदगावकर ,पद्मश्री नारायण सुर्वे, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलकर्णी ,प्रा. पु.द कोडोलीकर, सुवार्ताचे संपादक फा. फ्रान्सिस दिब्रिटो, नितीन केळकर, डिंपल पब्लिकेशनचे अशोक मुळे या सर्वच मान्यवरांच्या प्रोत्साहनामुळें मी लिहीत गेलो असे ते आवर्जून सांगतात.

साहित्याच्या प्रेमांत अखंड बुडालेले अनिलराज यांनी १५ ऑगस्ट २000 रोजी ‘लीलाई’ दिवाळी अंकाची मुहूर्तमेढ रोवली. संपादक अनिलराज रोकडे यांच्या आई कै. लिलाबाई यांच्या स्मृतिनिमित्त त्यांनी आपल्या दिवाळी अंकाचे नांव’ ‘लिलाई’ असे ठेवलें. ज्येष्ठ साहित्यिक रॉक कार्व्हालो ,कोलासो ,हरिहर बाबरेकर ,अनिलराज यांची बहीण सौ मंगला व मेव्हणें सुभाष राऊत यांचे प्रोत्साहनहीं त्यांना मिळालें.आजतागायत ‘लिलाई ‘अंकाचे काम नेटाने चालू आहे.

डॉ. विजया वाड, नाटककार गवाणकर, अँण्ड्रू कोलासो हे लिलाई दिवाळी अंकाचे सल्लागार आहेत. आज पर्यंत डॉ. सुभाष भेंडे,केशव मेश्राम, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, प्रदीप भिडे, लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण, भारतकुमार राऊत,चंद्रशेखर धर्माधिकारी,सुलोचना दिदी मोहन जोशी, शिरीष पै, रोहिणी हट्टंगडी, मंगेश पाडगावकर, विजया राजाध्यक्ष अशा अनेक मान्यवरांनी या अंकाचे प्रकाशन केलेलें आहे.

गंगाराम गवाणकर, विजया वाड,माधवी कुंटे, किरण येले ,प्रतिभा सराफ, प्रमोद कर्नाड,सिसिलिया कार्व्हालो, अशोक बागवे,प्रवीण दवणे, महेश केळुसकर अशा अनेक मान्यवरांचे लेख कथा कविता यात असतात. मान्यवरांबरोबरच नवोदितांनाही ते संधी उपलब्ध करून देतात.

वसई -विरार महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष, कोकण मराठीं साहित्य परिषदेच्या वसई शाखेचें अध्यक्ष आणि पालघर शाखेचें कार्याध्यक्ष अशी अनेक मानाचीं पदें ते आज भूषवीत आहेत. जिल्हास्तरीय ‘समाजगौरव’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यांत आले आहे.,पुढारी वृत्तसमूहांतर्फे पालघर जिल्ह्यातून सर्वोत्कृष्ट पत्रकार म्हणूनहीं त्यांचा गौरव करण्यांत आलेला आहे.

अनिलराज यांच्या या सामाजिक साहित्यिक प्रवासांत त्यांची अर्धांगिनी सौ .पूजा- वहिनी यांनीही त्यांना नेहमीच साथ दिली .आणि आता त्यांनी लिलाई दिवाळी अंकाच्या संपादक पदाची धुराही यशस्वीपणें पार पाडायला सुरुवात केली आहे .कुठल्याहीं यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते हे त्यांनी सिद्ध करून दाखविलें.मी गेली बारा वर्षे लीलाई दिवाळी अंकात परिसंवाद लिहीत आहे ,आणि उपसंपादक म्हणून कार्यरत आहे.

या चांगल्या अंकासाठी मी लिहिते याचा मला सार्थ अभिमान आहे. हे वर्ष ‘लिलाई दिवाळी अंकाचे ‘रौप्य महोत्सवीं, वर्ष आहे .असेच उत्तमोत्तम साहित्य ‘लीलाई ‘दिवाळी अंका- तर्फे रसिक वाचकांपर्यंत पोहोचो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
अभिनेत्री,लेखिका
    ज्योती निसळ.

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: