आकोट – संजय आठवले
आमदार प्रकाश भारसाखळे यांचे तिबार उमेदवारीला विरोध असल्याने पक्षाचा राजीनामा देऊन नामांकन अर्ज भरणारे आणि भाजप श्रेष्ठींशी चर्चा झाल्यावर भारसाखळे यांचे करिता नामांकन मागे घेणारे डॉ. महल्ले यांना पक्षातून निष्कासित केल्याने पक्षांतर्गत विरोधकांना प्रचारादरम्यानच संपविण्याचा भारसाखळे यांचा डाव असल्याचे उघड झाले आहे.
परंतु दर्यापूर मतदार संघात मित्र पक्षाचे उमेदवारास विरोध करून अपक्ष उमेदवाराची पाठ राखण करणाऱ्या भारसाखळे आणि सहकारी यांचेवर भाजपाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने आकोट मतदार संघातील भाजप परिवारात आश्चर्य मिश्रित रोष बघावयास मिळत आहे.
स्थानिक उमेदवारी आणि सर्वच स्तरातील नाराजी या मुद्द्यांवर आमदार भारसाखळे यांना भाजप अंतर्गत प्रचंड विरोध झाल्याचे सर्वविदित आहे. या नाराजीतूनच विरोधकांचे प्रतिनिधी म्हणून डॉ. गजानन महाले यांनी पक्षाकडे राजीनामा सोपवून आपली उमेदवारी घोषित केली होती.
मात्र अर्ज मागे घेण्याचे दिवशी पक्षश्रेष्ठींचे निर्देशानुसार त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे ते पक्षासोबतच राहणार हे निश्चित झाले होते. परंतु तरीही प्रदेश भाजप कार्यालयाचे सचिव मुकुंद कुळकर्णी यांचे स्वाक्षरीने डॉ. महल्ले यांना पक्षातून निष्कासित करण्यात आले. सोबतच त्यांनी उमेदवारी मागे घेण्याकरिता मोठी देवघेव केल्याचा ठपकाही ठेवण्यात आला.
ह्या प्रकाराने आकोट मतदार संघातील भाजप परिवारात मोठी खळबळ उडाली आहे. मागील दहा वर्षात भाजप नेते, कार्यकर्ते, नगरसेवक यांचेशी फटकून वागणारे भारसाखळे आता पक्षांतर्गत विरोधकांना जेरीस आणणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. परिणामी आपल्या सुरक्षा संदर्भात भाजपा परिवारात धाकधूक निर्माण झाली आहे. येथे उल्लेखनीय आहे कि, शेजारच्या दर्यापूर मतदार संघात भाजपाने आपला मित्र पक्ष शिवसेना शिंदे गटाला उमेदवारी दिली आहे.
असे असतानाही भाजपच्या सौ. नवनीत राणा यांनी त्यांचे पती रवी राणा यांच्या पक्षाचा उमेदवार उभा केलेला आहे. या उमेदवाराचे प्रचार बॅनर वर अमरावती भाजपा जिल्हाध्यक्ष अनिल बोंडे, सौ. नवनीत राणा व प्रकाश भारसाखळे यांचे फोटो छापलेले आहेत. त्यावरही ताण म्हणून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांचे फोटोही त्यावर छापलेले आहेत.
महत्त्वाचे म्हणजे भाजप सेना युतीच्या अधिकृत उमेदवाराला मुंबईचे पार्सल म्हणून परत पाठवा असा प्रचार केला जात आहे. मजेशीर बाब म्हणजे हा प्रचार अमरावती भाजपा जिल्हाध्यक्ष अनिल बोंडे, सौ. नवनीत राणा व प्रकाश भारसाखळे यांचे नावाने केला जात आहे. यावरून प्रकाश भारसाकळे यांचा दर्यापूर येथे पार्सलला विरोध असल्याचे लक्षात येते. परंतु स्वतः भारसाखळे हे आकोट मतदार संघात दर्यापूरचे पार्सल आहेत.
म्हणजेच तेही आकोट वरून परत जाण्यास पात्र ठरतात. परंतु आपण पार्सल असल्यावरही आकोटात मात्र ते स्वतःला निवडून देण्याची विनंती मतदारांना करीत आहेत. यावरून “आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्टे” असा न्याय भारसाखळे लावीत असल्याचे दिसून येत आहे.
दुसरे म्हणजे अमरावती भाजपा अध्यक्ष अनिल बोंडे आणि सौ.नवनीत राणा यांनाही दर्यापूर येथील आपल्याच मित्र पक्षाचा उमेदवार पार्सल वाटतो. परंतु आकोट येथे भारसाखळे हे सुद्धा पार्सल आहेत हे त्यांना दिसत नाही. त्यात कहर म्हणजे बोंडे, राणा, भारसाखळे हे दर्यापूर येथील अपक्ष उमेदवारास सहकार्य करीत आहेत, हे भाजपा पक्षश्रेष्ठींनाही दिसत नाही.
उलट आकोट येथे मात्र स्थानिक उमेदवाराचा आग्रह करणारे निष्ठावान भापाई हे मात्र भाजपा पक्षश्रेष्ठींना पक्षविरोधी कारवाया करणारे वाटतात. परिणामी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली जाते. भाजपच्या या गौडबंगालामुळे आकोटातील भाजपाई अचंबित झालेले आहेत. सोबतच आकोट आणि दर्यापूर येथील मतदार भाजपाच्या ह्या वागण्याची खिल्ली उडविताना दिसत आहेत.
विशेष म्हणजे आकोट व तेल्हारा तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत. पक्षीय हिशेबाने या कार्यकर्त्यांनी भारसाखळे यांना धारेवर धरावयास हवे. परंतु त्यांचे गोटातत मात्र दर्यापूर बाबत स्मशान शांतता दिसून येत आहे. उलट ही मंडळी भारसाखळे यांचे करिता कामास लागल्याचे वृत्त आहे.
या प्रकाराने या कार्यकर्त्यांबाबत जनमानसात आश्चर्य व्यक्त होत आहे. भाजपाच्या या बनवाबनवी मुळे अमरावतीचे भाजपा अध्यक्ष डॉ. अनिल बोंडे, सौ. नवनीत राणा आणि प्रकाश भारसाखळे यांचेवरही डॉ. गजानन महल्ले यांचेच प्रमाणे निष्कासनाची कार्यवाही व्हावी आणि या तिघांचेही म्हणण्यानुसार दर्यापुरात असलेल्या मुंबईचे पार्सलसह आकोट येथील दर्यापूरचे पार्सल असलेले प्रकाश भारसाखळे यांनाही परत पाठवावे, असा मतप्रवाह मतदारांमध्ये वाहू लागला आहे.