आकोट – संजय आठवले
“आता आम्हाला पार्सल नको स्थानिक उमेदवार हवा” अशी आकोट मतदार संघातील भाजप नेते कार्यकर्त्यांची मागणी धुडकावून भाजपने दर्यापूर निवासी प्रकाश भारसाखळे यांचे आकोट उमेदवारीवर शिक्का मोर्तब करीत संपूर्ण आकोट तेल्हारा तालुक्यांमध्ये लायकीचा एकही उमेदवार नसल्याचा संदेश दिला आहे. परंतु गतकाळात अनेक पक्ष बदलणाऱ्या भारसाखळे यांनी मात्र आकोटात स्वतः पार्सल असूनही दर्यापूर मतदार संघात महायुतीने दिलेल्या उमेदवाराला पार्सल ठरवून दर्यापूर येथील अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दर्शविल्याची समाज माध्यमातून जबर चर्चा होत आहे. त्यामुळे आकोटात स्वतः पार्सल बनून राहायचं आणि दर्यापूर येथील पार्सल उमेदवाराला हुसकावून लावायचं अशी दुटप्पी नीती भारसाखळे यांनी अवलंबिली असल्याचे उघड झाले आहे.
दर्यापूर अंजनगाव परिसरात समाज माध्यमात दोन पोस्टर्स सध्या चांगलेच धुमाकूळ घालित आहेत. एका पोस्टर मध्ये दर्यापूरचे माजी आमदार रमेश बुंदिले हे अपक्ष उमेदवार असल्याचे दर्शविण्यात आले आहे. त्यासोबतच या पोस्टरमध्ये युवा स्वाभिमान व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार, आपल्या हक्काच्या माणसाला संधी देऊ या आणि बाहेरचे पार्सल परत पाठवू या, निशाणी पाना असा मजकूर लिहिलेला आहे. या पोस्टरवर सौ. नवनीत राणा, रवी राणा, रमेश बुंदिले, प्रकाश भारसाकळे आणि राज्यसभा खासदार तथा अमरावती भाजपा अध्यक्ष डाॅ. अनिल बोंडे यांची छायाचित्रे दर्शविण्यात आली आहेत.
या पोस्टर पाठोपाठ दुसरे पोस्टरही व्हायरल करण्यात येत आहे. यामध्ये चला नामांकन भरायला, युवा स्वाभिमान पार्टी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार, आपल्या हक्काचा भूमिपुत्र रमेश बुंदिले यांची नामांकन अर्ज रॅली असा मजकूर लिहून रॅलीची वेळ व स्थळ नमूद केलेले आहे. या पोस्टर मध्ये पहिल्याच पोस्टर मधील छायाचित्रांसह स्व. अटल बिहारी वाजपेयी व स्व. बाळासाहेब ठाकरे यांची छायाचित्रे ही प्रकाशित करण्यात आली आहेत. समाज माध्यमातून हे दोन्ही पोस्टर्स प्रचंड व्हायरल करण्यात येत आहेत. त्यासोबतच युवा स्वाभिमान या पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी हे पोस्टर्स स्टेटस म्हणून आपल्या मोबाईल मध्ये ठेवलेले आहेत.
यात उल्लेखनीय बाब म्हणजे प्रकाश भारसाखळे यांना आकोट मतदार संघातून भाजपचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे आकोट मतदार संघात ते स्वतः दर्यापूरचे पार्सल म्हणून विख्यात आहेत. डॉ. अनिल बोंडे हे अमरावती जिल्हा ग्रामीणचे भाजपा अध्यक्ष आहेत. सोबतच ते पक्षाकडून राज्यसभा खासदार म्हणून कार्यरत आहेत. सौ. नवनीत राणा या भाजप सदस्य असून त्यांनी भाजपाकडून गत लोकसभा निवडणूक लढविलेली आहे. तर रवी राणा हे स्वतःला महायुतीचा घटक म्हणून आपली ओळख देत असतात. तर रमेश बुंदिले यांनी मागील काळात भाजपच्या चिन्हावर लढून पाच वर्षे आमदारकी उपभोगलेली आहे. यावरून ध्यानात येते कि, हे सारे प्राणी महायुती विशेषत: भाजपशी जुळलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून महायुती विरोधात कोणतीही कारवाई अपेक्षित नाही.
त्यातच दर्यापूरची जागा महायुतीमध्ये शिंदे गटाला सोडण्यात आलेली आहे. त्यामुळे सौ. नवनीत राणा, रवी राणा रमेश बुंदिले, डॉ. अनिल बोंडे आणि प्रकाश भारसाकळे यांनी शिंदे गटाचे उमेदवार अभिजीत अडसूळ यांना सहकार्य करणे अपेक्षित आहे. परंतु तसे न होता राणा दांपत्य, भारसाखळे आणि बोंडे हे बंडखोर अपक्ष उमेदवार रमेश बुंदिले यांचे समर्थनात उतरल्याचे दिसत आहे. त्यामुळे हे लोक नेमके कोणत्या पक्षाचे? आणि कुणाच्या आदेशाने ही पक्ष फितुरी करीत आहेत? असे प्रश्न निर्माण होत आहेत. दुसरे म्हणजे दर्यापूर मतदार संघात मुंबई येथून आलेले अभिजीत अडसूळ हे पार्सल आहेत, तर अमरावती जिल्ह्यातून कपट आणि दाम रीतीने आकोट मतदार संघात घुसलेले प्रकाश भारसाखळे हे सुद्धा आकोटात पार्सल आहेत. तरी ते आकोट वर कोणत्या तोंडाने आपला हक्क सांगत आहेत? असाही प्रश्न या निमित्ताने उभा झालेला आहे.
येथे उल्लेखनीय आहे कि, मागील महिन्यात दर्यापूर येथे रस्त्यातील झाडे तोडणे संदर्भात भारसाखळे व स्थानिक नागरिकांमध्ये चांगलाच बेबनाव झाला होता. त्यावेळी नागरिकांनी भारसाखळे यांना “तुम्ही आकोटचे आमदार आहात दर्यापूरचे नाही” असे सुनावले होते. तेव्हा “मी दर्यापूरचाही आमदार आहे” अशी दर्पोक्ती भारसाखळे यांनी केली होती. त्यामुळे आकोट येथे भाजपच्या स्थानिक लोकनेत्यांना डावलून स्वतःचे पार्सल प्रस्थापित करणे आणि दर्यापूर येथे भाजपच्याच मित्र पक्षाच्या उमेदवाराला पार्सल म्हणून हूसकावून लावण्याचे षडयंत्र रचणे अशी भाजप विरोधी चाल भारसाखळे चालत असून या दोन्ही ठिकाणी आपले वर्चस्व दर्शवीत असल्याचे दिसून येते.
आकोट आणि दर्यापूर येथे अशा भाजप विरोधी कारवाया करून भारसाखळे स्वतःला भाजपाचे सर्वेसर्वा समजतात की काय? अशी शंका निर्माण झाली आहे. सोबतच भाजप पक्षश्रेष्ठी समोर गयावया करून आकोट येथे स्वतःचे पार्सल प्रस्थापित करणे आणि दर्यापूर येथे भाजप पक्षश्रेष्ठींनीच दिलेल्या मित्र पक्षाच्या उमेदवाराला पार्सल ठरवून विरोध करणे आणि त्याकरिता भाजपचा एक राज्यसभा खासदार, एक खासदारकीची निवडणूक लढविलेला उमेदवार आणि एक भाजपा मित्र पक्षाचा आमदार यांना आपल्या षडयंत्रात सहभागी करून घेणे यामुळे भारसाखळे हे भाजपमध्ये स्वतःचा सवता सुभा निर्माण करीत आहेत की काय? या शंकेची पाल चुकचुकत आहे. मजेदार म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा प्रदेश भाजपाचे सर्वाधिक पाॅवरफुल नेते देवेंद्र फडणवीस यांचे विदर्भातच भारसाखळे हे षडयंत्र रचित आहेत. तरीही भारसाखळे यांच्या या षडयंत्राची फडणवीसांना कानो कान खबर लागू नये या बाबीचे मोठे आश्चर्य निर्माण झाले आहे.