राजु कापसे प्रतिनिधी
रामटेक :- गट ग्रामपंचायत बोरडा (सराखा) अंतर्गत येणाऱ्या बोरडा गावठाण पट्टे गेल्या 15 वर्षापासून वाटप करण्यात न आल्याने गावातील घरकुल धारकांना स्वतःचे घर निर्माण करण्यासाठी प्रलंबित गावठाण हद्दीतील पट्टे तात्काळ उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे यांना दि.12 सप्टेंबर रोजी देण्यात आले.
रामटेक तालुक्यातील बोरडा येथे मागील 15 वर्षांपासून सरकारी पट्टे उभारण्यात आले होते.परंतु 15 वर्षे लोटूनही त्यांचं वाटप झाले नव्हते. बरेचदा प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांना गावठाण पट्टे मार्गी लावण्याचे निवेदन देऊनही लक्ष देत नसल्याने आतापर्यंत गावातील गरजू नागरिक घरकुल लाभापासून वंचित आहेत. यातील काही गरजू लोकांना घरकुल बांधकाम करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने अनेकांचे घरकुल रद्द झाल्याची देखील माहिती आहे. अशातच 15 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गावठाण पट्टे वाटपाचा मुद्दा तात्काळ निकाली काढण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार यांना देण्यात यावे असे निवेदन खासदार श्यामकुमार बर्वे यांना देण्यात आले. तर एका आठवड्यात गावठाण मुद्दा निकाली काढतो असे आश्वासन बर्वे यांनी दिले.
यावेळी गट ग्रामपंचायत बोरडा येथील उपसरपंच पंकज चौधरी, समाजसेवक कुंडलिक जांभुळे, निलेश नारनवरे, रवींद्र चौधरी, गजानन नेवारे, प्रवीण गजबे, नंदकिशोर लुटे आदी उपस्थित होते.