रामटेक – राजु कापसे
नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यांतर्गत येणाऱ्या खंडाळा येथील एका महिलेला सर्पदंश झाल्यानंतर गावातील नागरिकांनी दवाखान्यात न घेऊन जाता भोंदू बाबाकडे घेऊन गेल्याने थातुरमातुर उपचार केल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि.10 सप्टेंबर रोजी घडली.
प्राप्त माहितीनुसार, मौदा पोलीस स्टेशन हद्दीतील खंडाळा येथील रहिवासी कल्पना विजय बोन्द्रे वय 41 वर्ष. यांना 9 सप्टेंबर रोजी अतिविषारी घोणस सापाने दंश केला होता. नातेवाईकांनी महिलेला पुढील उपचारासाठी दवाखान्यात न घेऊन जाता गावातील भोंदू बाबाकडे घेऊन गेले.त्यांनी जडीबुटी, लेप लावून थातुरमातुर उपचार करून घरी पाठविले.
मात्र पहाटेच्या सुमारास अचानक महिलेच्या प्रकृतीत बिघाड येऊ लागल्याने तिला उपजिल्हा रुग्णालय, रामटेक येथे नेण्यात आले.मात्र दवाखान्यात घेऊन जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
सर्पदंश झालेल्या व्यक्तीला प्रथमतः दवाखान्यात घेऊन जावे याकरिता सर्पमित्र प्रत्येक वेळी जनजागृती करीत असतात.मात्र ग्रामीण भागात या जनजागृतीचा कुठलाही परिणाम होतांना दिसून येत नाही.
वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष व सर्पमित्र राहुल कोठेकर यांनी महिलेचा मृत्यू कुटुंबियांच्या आणि भोंदू बाबाच्या चुकीमुळे झाल्याचा आरोप करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, याअगोदर देखील अशा भोंदू बाबांवर कारवाई करण्यासाठी मा.जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाला निवेदन देऊनही कुठलीही कारवाई होत नसल्याचा आरोप राहुल कोठेकर यांनी केला आहे.