रामटेक – राजु कापसे
नागपूर जिल्ह्यातील रामटेक प्रादेशिक वनविभाग कार्यालय अंतर्गत येणाऱ्या गट ग्रामपंचायत माहुली हद्दीतील घुकसी विटभट्टा परिसरात रात्रीच्या सुमारास बिबट्याने बांधलेल्या ६ वासरांवर हल्ला करून ठार केले.. प्राप्त माहितीनुसार, पेट्रोल पंप डुमरी येथील रहिवासी उमाशंकर जगदीश गुहिरे यांना घुकसी येथील वीट भट्टा परिसरात स्वतःच्या मालकीचे सुमारे ५० ते ६० जनावरे गोठ्यात बांधले होते. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात प्रवेश केला व गोठ्यात बांधलेल्या ६ वासरांवर हल्ला करून ठार केले.
यात ४ गायीच्या आणि २ म्हशीच्या वासरांचा समावेश आहे. शेतकऱ्याने घटनेची माहिती वनरक्षक डी.जी.विभूते यांना दिली.त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ आहे.करिता वनविभागाने धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे…