Thursday, September 12, 2024
spot_img
Homeराज्यमहसूल पंधरवाडा; जिल्हा व तालुकास्तरावर आपत्ती व्यवस्थापनविषयी मार्गदर्शन; नैसर्गिक आपत्तीत बचाव, प्रथमोपचाराचे...

महसूल पंधरवाडा; जिल्हा व तालुकास्तरावर आपत्ती व्यवस्थापनविषयी मार्गदर्शन; नैसर्गिक आपत्तीत बचाव, प्रथमोपचाराचे दिले प्रशिक्षण…

अमरावती – दुर्वास रोकडे

अमरावती जिल्ह्यातील महसूल पंधरवाडा अंतर्गत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाव्दारे जिल्हा व तालुकास्तरावर आपत्ती व्यवस्थापनविषयी मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजन करण्यात आले. जिल्हास्तरावर नियोजन भवन येथे तर तालुकास्तरावर सर्व तहसिल कार्यालय येथे नैसर्गिक आपत्तीप्रसंगी बचाव व प्राथमिक उपचार याबाबत प्रात्यक्षिकांच्या सादरीकरणातून मार्गदर्शन व जनजागृती करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे रविवार दि. 11 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी(महसूल) विजय जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, तहसिलदार प्रशांत पडघन, विजय लोखंडे, विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक अनिल चौरपगार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर आदी उपस्थित होते.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भटकर मार्गदर्शन करताना म्हणाले की, जिल्ह्यात आपत्ती घडल्यास आपत्ती प्रसंगी कार्य करावे याविषयी जनजागृती करणे महत्वाचे आहे. यासाठी प्रत्येकांनी आपत्ती व्यवस्थापनाविषयी माहिती जाणून घ्यावी. तसेच स्वत: सुरक्षित राहून आपत्तीग्रस्ताची मदत करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आपत्तीग्रस्त व्यक्तीवर प्रथमोपचार कसा करावा, याविषयी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. सुदेश यांनी मार्गदर्शन केले. तसेच जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास त्या विकाणी काय करावे व काय करू नये. तसेच जिवित हानी टाळण्यासाठी घरगुती व स्थानिक वस्तूंचा वापर करून बचाव साहित्य कसे वापरावे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले.

गावामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्यास वृध्द, महिला व व लहान मुलांना पुराच्या पाण्यातून सुरक्षितरित्या बाहेर कसे काढावे याबाबत वेगवेगळ्या पद्धतीने प्रात्यक्षिक राबविण्यात आले. ग्रामीण भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्यास स्थानिक लोकांच्या मदतीने जीवित हानी टाळता येऊ शकते, याविषयी जिल्हा शोध व बचाव पथकाने शासकीय कर्मचारी, पोलीस पाटील, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना मार्गदर्शन केले.

तर जिल्हा शोध व बचाव पथकाचे कर्मचारी सचिन धरमकर, विशाल निमकर, देवानंद भुजाडे, दिपक डोरस, दिपक पाल, आकाश निमकर, भूषण बैद्य, राजेंद्र शहाकार, गणेश जाधव, गजानन वाडेकर, अर्जुन सुंदरडे, दिलीप भिलावेकर, दिपक चिल्लोरकर, प्रफुल्ल भुसारी, महेश मांदळे, शरद भांदारगे, अमोल साळुंखे, अतुल कपले, श्रीकांत जवंजाळ यांनी प्रात्यक्षिके करून दाखविले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: