नैसर्गिक आपत्तीत बचाव, प्रथमोपचार व सीपीआरचे दिले प्रशिक्षण…
दिव्यांगाच्या योजनांची जनजागृती व माजी सैनिकांचा सत्कार…
अमरावती – दुर्वास रोकडे
१ ऑगस्टपासून राज्यात सर्वत्र ‘महसूल पंधरवडा’ साजरा केला जात आहे. ‘महसूल पंधरवडा’निमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाव्दारे नैसर्गिक आपत्तीप्रसंगी बचाव व प्राथमिक उपचार याबाबत प्रात्यक्षिकाच्या सादरीकरणातून प्रशिक्षण देण्यात आले.
महसूल उपायुक्त संजय पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तसेच सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, अधीक्षक अभियंता पल्लवी सोनोने प्रमुख अतिथी म्हणून आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री. पुंड, जिल्हा परिषदेचे दिव्यांग कल्याण अधिकारी पुरुषोत्तम शिंदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर व चमू, विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक अमरजीत चौरपगार यावेळी उपस्थित होते.
जिल्हा शोध व बचाव पथकाचे सदस्य गजानन वाडेकर यांनी नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी बाधितांचे प्राण वाचविण्यासाठी प्रथमोपचार कसा करावयाचा, हार्ट अटॅक किंवा कार्डियॅक अरेस्ट आल्यावर कशा पध्दतीने सीपीआर द्यावा, याबाबतचे प्रात्यक्षिकाच्या सादरीकरणातून प्रशिक्षण दिले. कार्डियॅक अरेस्ट आल्यावर पहिल्या पाच ते सहा मिनीटांत संबंधित व्यक्तीला प्रथमोपचार (सीपीआर) मिळाला तर एखादा व्यक्तीचे प्राण वाचू शकते.
नैसर्गिक आपत्ती प्रसंगी पूर परिस्थितीत आपला व इतरांचा जीव कसा वाचवावा यासंबंधी जिल्हा शोध व बचाव पथकाचे सदस्य राजेंद्र शहाकार यांनी प्रात्यक्षिकांच्या सादरीकरणातून उपस्थितांना प्रशिक्षण दिले. घरी उपलब्ध असलेल्या पाण्याचा गुंड, खाली डबक्या, ड्रम, लाकूड, थर्मकॉल आदी टाकावू साहित्यांचा वापर करुन पाण्यावर तरंगणारे व बचावासाठी उपयुक्त ठरणाऱ्या वस्तूंच्या वापराबाबत मार्गदर्शन केले.
दिव्यांग व्यक्तींच्या शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसनासाठी राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसंबधी जिल्हा परिषदेचे दिव्यांग कल्याण अधिकारी श्री. शिंदे यांनी यावेळी माहिती दिली. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार दिव्यांग व्यक्तींना प्रदान करण्यात आलेले अधिकार व सोयी-सुविधांबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली. विभागीय आयुक्त कार्यालयातील माजी सैनिक पुरुषोत्तम काळे, वाल्मिक वानखडे यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुस्तक व गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला.
नैसर्गिक आपत्तीच्यावेळी कशा पध्दतीने बचाव करावा याबाबत जिल्हा शोध व बचाव पथकाचे गणेश जाधव, दिपक पाल, भूषण वैद्य आदींनी यावेळी प्रात्यक्षिक सादर केलीत. विभागीय आयुक्त कार्यालयातील सर्व विभागांचे अधिकारी-कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.