महिला भगिनींनी लाभ घेण्याचे आ.सौ. सुलभाताई खोडके यांचे आवाहन…
शहरात सहा ठिकाणी अर्ज वाटप व स्वीकृतीकरीता निशुल्क सुविधा केंद्र सुरु…
अमरावती – दुर्वास रोकडे
महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनाच्या वतीने मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. अमरावती विधानसभा मतदार संघातील महिलांना या योजनेसाठी योजनेकरिता अर्ज करण्याची सुविधा व्हावी म्ह्णून आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांच्या सौजन्याने शहरात सहा ठिकाणी सुविधा केंद्र सुरु करून शिबीर राबविले जात आहे. मंगळवार दिनांक २३ जुलै २०२४ रोजी आ.सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते लाभार्थींना अर्जाचे वाटप करून सुविधा केंद्रांचा शुभारंभ करण्यात आला.
महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित ,परित्यक्त्या आणि निराधार व एकल महिला तसेच कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये शासनाकडून दरमहा १,५०० रुपये इतका लाभ मिळणार असून वर्षाला १८ हजार रुपये देय राहणार आहे.
या योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा यासाठी त्यांना अर्ज प्रकिया, आवश्यक कागदपत्रे, संपूर्ण माहिती तसेच त्यांचे अर्ज वाटप, अर्ज भरणे व अर्ज स्वीकृती करण्याची प्रक्रिया आदीबाबत सुविधा मिळावी म्ह्णून आमदार महोदयांनी पुढाकार घेऊन सुविधा केंद्र सुरु करून शिबीर राबविण्यात आले आहे.
शिबीर स्थळी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजे पर्यंत मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना संदर्भात अर्ज भरण्यासाठी ऑफलाईन व ऑनलाईन सुविधा पुरविली जाणार आहे. आगामी ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत योजनेचे अर्ज भरण्याची मुदत असल्याने मुदतीच्या तारखेपर्यंत हे सुविधा केंद्र सुरु राहणार आहे.
दरम्यान आमदार महोदयांच्या हस्ते योजनेच्या अर्जाचे वाटप करून जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी अनेक महिलांनी आ.सौ.सुलभाताई खोडके यांच्याशी संवाद साधून योजनेसंदर्भात अडचणींबाबत अवगत केले. तसेच सुविधा केंद्र सुरु केल्या बद्दल आभार प्रकट केले.
महिलांचा आर्थिक विकास व आत्मनिर्भर बनविण्यासाठी तसेच त्यांची कुटुंबातील निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनाच्या वतीने मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना १ जुलै २०२४ पासून सुरु करण्यात आली असल्याने अमरावती मधील जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ मिळावा, म्हणून सुविधा केंद्र सुरु करण्यात आले आहेत , याचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन आ. सौ. सुलभाताई संजय खोडके यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या ठिकाणी अर्ज भरण्याची सुविधा
१) महेंद्र कॉलनी,पांढरी हनुमान मंदिर रोड, गोकुलधाम सोसायटी.
२ ) महेंद्र कॉलनी प्रभाग म.न.पा.आसीर कॉलनी दवाखाना, अमरावती
३ ) म.न.पा. उर्दू शाळा क्रमांक ९, नूर नगर, अमरावती
४) मस्जिद तयेबा, म.न.पा. बिल्डिंग, अन्सार नगर, अमरावती
५) गुलिस्तां नगर चौक, डॉ. कासिफ हॉस्पिटल जवळ अमरावती
६) हैदरपूरा, मद्रासीबाबा दरगाह समोर मनपा आरोग्य केंद्र, अमरावती