मदन रामटेके यांचे प्रयत्न फळास…
भंडारा – सुरेश शेंडे
साकोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद जागेचा विकास करून उत्पन्न वाढावे यासाठी जिल्हा विकास निधीवर भर देत पहिल्यांदाच जिल्ह्यात १२ करोड रुपयांचा जिल्हा विकास निधी प्राप्त झाला आहे. जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच जिल्हा विकास निधीमधून १२ करोड रुपये आणण्यात आले आहेत. या निधीमुळे जिल्हा परिषद जागेचा विकास करून जिल्हा परिषदेच्या उत्पादनात भर पडणार आहे. इतकेच नव्हे तर ही वाढ आजीवन राहणार असून उत्पन्नासाठी सतत फिरणारा हा मीटर आहे.
विशेष बाब अशी की, हा १२ करोड रुपयांचा निधी केवळ साकोली साठी आहे हे देखिल साकोलीच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे. या निधीतून जुनी पंचायत समिती आणि न्यायालयीन बाजूचे बी.डि.ओ. निवासस्थान येथे दुमजली कॉम्प्लेक्स होणार आहे. भंडारा जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती मदन रामटेके हे वडद जिल्हा परिषद क्षेत्राचे प्रतिनिधित्व करतात.असे असूनही त्यांनी स्थानिक साकोलीसाठी १२ करोड रुपयांचा निधी ओढून आणला.
याकरीता गत १ वर्षापासून ते प्रयत्नशील होते. सभापती मदन रामटेके यांनी आमदार नाना पटोले यांच्या सहकार्यामुळे शक्य झाल्याचे सांगितले. साकोलीत दुमजली शॉपिंग कॉम्प्लेक्स मुळे जुन्या वसाहतीचे रूप पालटणार आहे. साकोलीत यापूर्वी नवीन तहसील, पंचायत समिती, पोलीस स्टेशन, सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय, राज्य उत्पादन कार्यालय साकोली या इमारतीनंतर जुनी पंचायत समिती आणि बि.डि.ओ. निवासस्थान जागेवर नवीन इमारत कालांतराने उभी होऊ घातली आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मुख्य जुने शहर गणेश वॉर्ड येथील जुनी पंचायत समिती आवारात व न्यायालयीन बाजूच्या खंडविकास अधिकारी निवासस्थानी आता शॉपिंग कॉम्प्लेक्स साकार होणार आहे. यावर प्रशासनाकडून मंजुरीवर शिक्कामोर्तब केले असून याचा संकल्पचित्र आराखडा सुद्धा तयार करण्यात आला आहे. काही महिन्यातच या इमारतीचे बांधकाम कार्यास सुरुवात होणार आहे. परिणामी मुख्य साकोली शहरातील दैनिय अवस्था झालेल्या व्यापार नगरीला जिल्हा परिषदेच्या विकास निधीने नवी चालना मिळणार आहे.
सन २०१६ पासून येथे नगरपरिषद अस्तित्वात आली आहे. मुख्य जुने शहर असलेल्या गणेश वॉर्ड, सिव्हिल वॉर्ड, अन तलाव वॉर्ड या प्रभागातील स्थानिक युवकांना रोजगार देण्यास मागील नगरपरिषद पदाधिकाऱ्यांना कोटीचा विकास निधी येऊनही अपयेश आल्याचे बोलले जाते. याकरिता साकोली तालुक्यातील वडद जिल्हा परिषद क्षेत्राची सदस्य आणि भंडारा जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती मदन रामटेके हे समोर आले आहेत.