रामटेक – राजू कापसे
अंगावर विज पडल्याने एका ३५ वर्षीय इसमाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना आज दि. १० जुलै ला दुपारी ४ च्या सुमारास तालुक्याच्या आदिवासीबहुल भागातील सिंदेवानी येथे घडली. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आनंद शंकर कुमरे रा.मनसर कांद्री हल्ली मुक्काम सिंदेवानी असे मृतकाचे नाव आहे. मृतक हा कांद्री ( मनसर ) येथील रहीवाशी होता. मात्र सिंदेवानी येथे सासऱ्याकडे तो घरजावई म्हणुन राहात होता तसेच सासऱ्याची शेती वाहात होता.
आज दुपारी ४ वाजता दरम्यान पाऊस सुरू झाल्यावर मृतक आनंद ने शेतातील बैल सोडले व लगबगीने घराकडे परत जाण्यासाठी निघाला असता गावापासुन काही अंतरावर तो येऊन पोहोचला असतांना तोच त्याच्या अंगावर विज पडली व त्याचा जागेवरच करुण अंत झाला. त्याच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. देवलापार पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला आहे.