IND vs ENG : भारताने उपांत्य फेरीत इंग्लंडचा 68 धावांनी पराभव करून T20 विश्वचषक 2024 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गयाना येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकात 7 गडी गमावून 171 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 16.4 षटकांत 103 धावांवर गारद झाला. आता 29 जून रोजी बार्बाडोस येथे भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाचा बदला घेतल्यानंतर भारताने आता २०२२ टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडकडून झालेल्या पराभवाचा बदलाही घेतला.
भारतीय संघ तिसऱ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. यापूर्वी टीम इंडियाने 2007 आणि 2014 मध्ये अंतिम सामना खेळला होता. दोन्ही सीजन मध्ये महेंद्रसिंग धोनी कर्णधार होता. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 10 वर्षांनंतर अंतिम फेरीत पोहोचली आहे. भारतीय संघ एका वर्षात सलग दुसऱ्या आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. याआधी टीम इंडियाने 2023 च्या वनडे वर्ल्ड कपमध्येही अंतिम फेरी गाठली होती. त्याचबरोबर भारताने सलग दुसऱ्या आयसीसी स्पर्धेत इंग्लंडचा पराभव केला आहे. याआधी टीम इंडियाने 2023 च्या वनडे वर्ल्ड कपमध्येही इंग्लंडचा पराभव केला होता.
भारतीय डाव
तत्पूर्वी, कर्णधार रोहित शर्माच्या (५७ धावा) कमी उसळीच्या खेळपट्टीवर खेळलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने टी-२० क्रिकेट विश्वाच्या पावसाने प्रभावित झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात गतविजेत्या इंग्लंडविरुद्ध सात विकेट्सवर १७१ धावा केल्या होत्या. डावाला गती देण्याच्या प्रयत्नात विराट कोहली (09) पुन्हा लवकर बाद झाला, पण रोहितला (39 चेंडूत 57) सूर्यकुमार यादव (36 चेंडूत 47 धावा) याच्या रूपाने चांगली जोडी मिळाली. या दोघांनी भारताला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेले.
पावसामुळे खेळ सुरू होण्यास एक तास 15 मिनिटे उशीर झाला. मधेच पुन्हा पावसाचा व्यत्यय आला आणि भारताची धावसंख्या आठ षटकांत दोन गडी गमावून ६५ धावा झाली. कोहली आणि रोहित जेव्हा फलंदाजीला आले तेव्हा हे स्पष्ट झाले की खेळपट्टी संथ होती आणि कमी उसळीमुळे फलंदाजांसाठी हे काम कठीण झाले होते. रोहित आणि कोहली या दोघांनीही डावाच्या सुरुवातीला रीस टोपली आणि जोफ्रा आर्चर या वेगवान गोलंदाजांच्या चेंडूंवर फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश मिळू शकले नाही.
गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याची उत्सुकता दाखवणाऱ्या कोहलीने टोपली आणि आर्चर या दोघांविरुद्धही फटके मारण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. अखेरीस त्याने टोपलेचा एक पूर्ण लांबीचा चेंडू मिड-विकेटवर षटकाराच्या जोरावर पाठवला. पण हा भारतीय सुपरस्टार डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाच्या शॉर्ट लेंथ चेंडूवर दोन चेंडूंनंतर बाद झाला. कोहलीने त्याच स्ट्रोकला ऑन साइड मारण्याचा प्रयत्न केला, पण तो बोल्ड झाला. त्यामुळे स्पर्धेतील त्याची खराब कामगिरी कायम राहिली.
त्याच वेळी, रोहितने परिस्थितीशी अधिक चांगले जुळवून घेतले आणि चेंडू उशिरा आणि स्टंपच्या मागे खेळण्याचा निर्णय घेतला. इतर फलंदाजांसाठी आदर्श ठेवत रोहितने टोपलीच्या तिसऱ्या षटकात सलग दोन चौकार मारले आणि त्यानंतर इंग्लंडचा मुख्य फिरकी गोलंदाज आदिल रशीदवर दबाव आणला. पॉवरप्लेमध्ये भारताने दोन गड्यांच्या मोबदल्यात 46 धावा केल्या होत्या. ऋषभ पंत (04) बाद होणारा दुसरा फलंदाज ठरला. सॅम करनच्या चेंडूला योग्य वेळ देऊ शकला नाही आणि मिडविकेटवर झेलबाद झाला.
त्यानंतर रोहित आणि रशीद यांच्यात रोमांचक लढत पाहायला मिळाली. भारतीय कर्णधाराने या लेगस्पिनरच्या सुरुवातीच्या षटकात दोन चौकार मारले. पाऊस पडला तेव्हा सूर्यकुमार यादव १३ धावांवर फलंदाजी करत होता. यामुळे तासाभराहून अधिक काळ खेळ थांबला होता. पावसाने फलंदाजांची लय बिघडवली आणि या ब्रेकनंतर इंग्लंडने रशीद आणि लियाम लिव्हिंगस्टोनचा दोन्ही बाजूंनी चांगला उपयोग करून घेतला. पण रोहित आणि सूर्यकुमारला रोखता आले नाही.
कुरनच्या 13व्या षटकात भारताने 19 धावा केल्या, ज्यामध्ये सूर्यकुमारने दोन षटकार मारले आणि रोहितने पिकअप शॉटसह षटकार लगावला, त्याने सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केले. दोघांनी 73 धावांची भागीदारी केली जी रोहित रशीदच्या गुगलीवर बाद झाल्यावर तुटली. हार्दिक पांड्याने (१३ चेंडूत २३ धावा) खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला दोन षटकार मारून डाव पुढे नेला.
शिवम दुबेच्या आधी मैदानात उतरलेल्या रवींद्र जडेजाने (नऊ चेंडूत नाबाद 17) आर्चरच्या षटकात दोन महत्त्वाचे चौकार मारले. तर दुबे केवळ एक चेंडू खेळून बाद झाला. शेवटच्या षटकात अक्षर पटेलने ख्रिस जॉर्डनच्या षटकाराने भारताला 170 च्या पुढे नेले. अखेरच्या पाच षटकांत संघाने 53 धावा केल्या.
इंग्लंडचा डाव
१७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडच्या संघाला कर्णधार जोस बटलर आणि फिल सॉल्टने वेगवान सुरुवात करून दिली. दोघांनी तीन षटकांत २६ धावा जोडल्या होत्या. यानंतर अक्षर पटेल गोलंदाजीसाठी आला आणि त्याने सामन्याचा मार्ग बदलला. त्याने बटलर (23), बेअरस्टो (0) आणि मोईन अली (8) यांना बाद केले. त्याचवेळी जसप्रीत बुमराहने फिल सॉल्ट आणि कुलदीप यादवने सॅम कुरनला (2) बाद केले.
26/0 पासून, इंग्लंडची धावसंख्या नवव्या षटकात 5 बाद 49 अशी होती. यानंतर हॅरी ब्रूकने स्थिरावण्याचा प्रयत्न केला, मात्र कुलदीपने त्यालाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. ब्रूकने 19 चेंडूत सर्वाधिक 25 धावा केल्या. लियाम लिव्हिंगस्टोन 11 धावा केल्यानंतर, ख्रिस जॉर्डन एक धावा करून, आदिल रशीद दोन धावा करून आणि जोफ्रा आर्चर 21 धावा करून बाद झाले. भारताकडून अक्षर पटेल आणि कुलदीप यादवने तीन-तीन बळी घेतले. तर जसप्रीत बुमराहने दोन विकेट घेतल्या. अक्षरला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.