दुसऱ्या टप्प्यात अकोला जिल्ह्यातून एकमेव शाळा…
पातूर – निशांत गवई
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मॉनिटर फेज २ मध्ये अकोला जिल्ह्यातून पातुरची किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल पुन्हा अव्व्ल ठरली आहे. महाराष्ट्रात निवडलेल्या टॉप ५० शाळांमध्ये पातूर येथिल किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल ने नामांकन मिळवले आहे.
विद्यार्थ्यामध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण व्हावी आणि त्यांनी लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून द्यावे. यासाठी दोन वर्षांपासून स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून आखण्यात आला आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात अकोला जिल्ह्यातून एकमेव किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल ने बाजी मारली होती. नुकतेच या उपक्रमातील दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील टॉप ५० ची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यामध्ये अकोला जिल्ह्यातून पातूर येथिल किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल ची निवड झाली आहे. शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे व कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे यांच्या मार्गदर्शनात शाळेमध्ये हे अभियान स्वच्छता मॉनिटर समन्व्यक अविनाश पाटील राबवित आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांनी केलेली अभिनव कामगिरीची दखल घेऊन ही निवड झाली आहे. मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमात सन्मानीत करण्यात येणार आहे. या निवडीमुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.