नागपूर – शरद नागदेवे
नागपूर – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर शाखेतर्फे फादर्स डे चे औचित्य साधून वि. वा. शिरवाडकर लिखित नटसम्राट या नाटकाच्या एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण व पितृऋण पुरस्कार सोहळा रविवार दिनांक ९ जून २०२४ रोजी गणेश नगर, नंदनवन लेआउट येथील महिला महाविद्यालयातील नवनिर्मित कै. कृष्णराव भागडीकर स्मरणार्थ सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबईचे विश्वस्त मा.श्री. डॉ. गिरीश गांधी हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. रवींद्र फडणवीस यांचे शुभहस्ते तसेच नाट्य परिषद नागपूर शाखेचे अध्यक्ष अजय पाटील व डॉ. रंजन दारव्हेकर यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला. रंगमंचावर नाट्य परिषद नागपूर शाखेचे उपाध्यक्ष श्री. विष्णू मनोहर, मुंबईचे कार्यकारी सदस्य श्री. संजय रहाटे आणि नाट्य परिषद नागपूर शाखेचे प्रमुख कार्यवाह श्री. नरेश गडेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
रंगभूमीवर अविरत कार्य केलेल्या वडीलधाऱ्या कलावंतांची आठवण ठेवून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पितृऋण पुरस्कार सुरू केला. या स्तुत्य उपक्रमासाठी नाट्य परिषद नागपूर शाखेचे डॉ.गिरीश गांधी यांनी अभिनंदन केले.
नटसम्राट या अजरामर नाटकाचे एकपात्री नाटकात संपादन करून ते रंगमंचावर सादर करण्याचं धाडस करून ते यशस्वी केले त्यासाठी रमेश लखमापुरे व दीपलक्ष्मी भट आणि संपूर्ण टीमचे कौतुकही केले. या एकपात्री नाट्य प्रयोगाचे असंख्य प्रयोग व्हावे अशी सदिच्छा डॉ.गिरीश गांधी यांनी व्यक्त केली.
कै.कृष्णराव भागडीकर यांच्या स्मरणार्थ नवनिर्मित सभागृहात हा कार्यक्रम अतिशय उत्तमपणे आयोजित केला. नाट्य परिषदेने या सभागृहात जास्तीत जास्त उपक्रम राबवावेत अशी इच्छा श्री. रवींद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. श्री. विनोद कुलकर्णी, श्री.राजा करवाडे, श्री.रविकिरण देशपांडे,श्री. ॲड. पराग लुले आणि श्री. प्रदीप धरमठोक या ज्येष्ठ कलावंतांना पितृऋण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर वि.वा. शिरवाडकर लिखित नटसम्राट या नाटकाचे एकपात्री नाट्य प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले. मूळ संहितेचे संपादन श्री. रमेश लखमापुरे यांनी नेमकेपणाने केले. दिग्दर्शन आणि प्रकाश योजनाही लखमापूरे यांनी अतिशय सुंदर केली. नाटकाचे नेपथ्य स्वप्निल बोहटे यांनी सांभाळले तर संगीताची जबाबदारी मंथन उकुंडे ह्यांनी उत्तमरीत्या पार पडली.
वेशभूषा प्राची व्यवहारे हिने केली. अपर्णा लखमापुरे व सत्यम निंबोळकर यांनी निर्मिती सहाय्य केले. नागपुरातील अभिनय संपन्न प्रतिथयश अभिनेत्री डॉ. दीपलक्ष्मी भट या गुणी अभिनेत्रीने नटसम्राट आप्पासाहेब बेलवलकर यांची भूमिका या एकपात्री नाटकातून अप्रतिमरित्या सादर केली. मानिनी बहुउद्देशीय संस्थेची ही प्रस्तुती होती.
फादर्स डे निमित्त एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण व पितृऋण पुरस्कार वितरण सोहळ्याला नागपुरातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलावंत प्रामुख्याने उपस्थित होते. सुप्रसिद्ध अभिनेते श्री. देवेंद्र दोडके यांनी सन्मान पत्राचे वाचन केले. श्री नरेश गडेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन दिपाली घोंगे यांनी अतिशय सुंदर पद्धतीने केले व आभार अखिल भारतीय नाट्य परिषद चे नागपूर शाखा अध्यक्ष श्री. अजय पाटील यांनी मानले.