Monday, September 23, 2024
Homeशिक्षणराज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची महत्त्वपूर्ण बैठक...

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची महत्त्वपूर्ण बैठक अकोल्याला..!

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात जमणार राज्यातील कृषी शास्त्रज्ञांची मांदियाळी!

अकोला – संतोषकुमार गवई

हवामान बदलाच्या आणि जागतिक पीक उत्पादन तथा उत्पादकतेच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत शेती क्षेत्राला बदलत्या परिस्थितीला सामोरे जाताना अधिक शाश्वत करण्याचे हेतूने महाराष्ट्र राज्यातील चारही कृषी विद्यापीठे आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

यांच शृंखलेत कृषि संशोधकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची ५२ वी त्रिदिवसीय बैठक महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 7 ते 9 जून 2024 दरम्यान अकोला येथे मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे.

सदर त्रिदिवसीय बैठकीदरम्यान महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठांचा केंद्रबिंदू असलेल्या शेतकरी बांधवांसाठी व एकूणच कृषी क्षेत्राचे उत्थान आणि उर्जितावस्थेसाठी विविध फायदेशीर पिकांचे सुधारित वाणांचे आणि सुधारित अवजारे व नाविन्यपूर्ण यंत्रांचे प्रसारण तसेच उपयुक्त अशा कृषी उत्पादन तंत्रज्ञानाच्या शिफारशींवर मान्यवरांद्वारे मंजुरी प्रदान करण्यात येणार आहे.

कृषी विद्यापीठांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची बैठक दरवर्षी राज्यातील एका कृषी विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात येत असते. यावर्षी हा बहुमान अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठास मिळाला असल्यामुळे सदर बाब उल्लेखनीय ठरते.

यानुषंगाने,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाद्वारे नवीन पिक वाण, सुधारित अवजारे व नाविन्यपूर्ण यंत्रे तसेच उत्पादन तंत्रज्ञान शिफारसी मिळून एकत्रितपणे 86 शिफारसी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीद्वारे 115 शिफारसी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीद्वारे ५७ शिफारसी तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीद्वारे 44 शिफारसी अशा एकूण 302 शिफारसींचे सादरीकरण संबंधित कृषी शास्त्रज्ञांद्वारे सभागृहातील मान्यवरांसमोर मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहेत.

सदर बैठकीचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 7 जून 2024 रोजी मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. सदर बैठकीचे काटेकोर नियोजन एकूण तीन तांत्रिक सत्रांमध्ये केले असून त्या अंतर्गत कृषी शास्त्र विषयक विविध १२ गटांचा समावेश करण्यात आला आहे. बैठकीचे प्रथम तांत्रिक सत्रामध्ये राज्यातील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या संशोधन संस्थांचे संचालक त्यांचे उपलब्धींचे सादरीकरण करणार आहेत. सोबतच, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि इतर तीनही कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक देखील त्यांच्या महत्वपूर्ण संशोधनात्मक उपलब्धीचे सादरीकरण करणार आहेत.

त्याचप्रमाणे बैठकीच्या द्वितीय दिवशी आयोजित दुसऱ्या तांत्रिक सत्रामध्ये चारही कृषी विद्यापीठांच्या कृषी शास्त्रज्ञांद्वारे विविध महत्वपूर्ण विषयांवरील संशोधनात्मक निष्कर्षांचे संगणकीय सादरीकरण होणार आहे. यामध्ये अनुक्रमे अन्नधान्य पिकांसाठी शेती पिके (पीक सुधारणा व धोरण), नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन, उद्यान विद्या, पशु विज्ञान व मत्स्यपालन, मूलभूत शास्त्रे, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान, पीक संरक्षण, कृषी अभियांत्रिकी, सामाजिक शास्त्रे, शेती पिके वाण प्रसारण समिती, उद्यानविद्या पीके वाण प्रसारण समिती, कृषी यंत्रे व अवजारे प्रसारण समिती, जैविक आणि अजैविक ताण सहन करणारे स्त्रोत नोंदणी प्रस्ताव व उपयुक्त सूक्ष्मजीव समिती आदी विषयांवरील महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश असणार आहे.

सदर बैठकीच्या तिसऱ्या व अंतिम दिवशी समारोपीय कार्यक्रमांमध्ये उपरोक्त 12 तांत्रिक गटनिहाय मंजूर करण्यात आलेल्या शिफारसींचे वाचन होऊन सदर शिफारसींना अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे.संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या या तीन दिवसीय बैठकीसाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील सुमारे 300 मान्यवर व शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीमध्ये मान्यता प्राप्त झालेल्या शिफारसी पुढे शेतकरी बांधवांचा विकास आणि एकूणच उत्थानासाठी कृषी विभागामार्फत प्रसारित करण्यात येत असतात.
अशाप्रकारे दिनांक 7 ते 9 जून 2024 दरम्यान डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे संयुक्त कृषी संशोधन व विकास समिती -2024 या अतिशय महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले असून तिनही दिवस महत्त्वपूर्ण अशा कृषी संशोधनात्मक व संवादात्मक तांत्रिक सादरीकरणाच्या माध्यमातून आयोजन केले आहे.

सदर बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ विलास खर्चे यांच्या पुढाकारात विविध समित्यांचे गठन करण्यात आले असून बैठकीचे यशस्वीतेसाठी सदर समित्यांचे अध्यक्ष,सचिव आणि सदस्य अहोरात्र परिश्रम घेत आहेत.

Santoshkumar Gawai
Santoshkumar Gawaihttp://mahavoicenews.com
मी संतोषकुमार गवई पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या ३२वर्षापासून कार्यरत आहे.सकारात्मक विचार मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतो म्हणून no negative only & only positive news यावरच माझा विश्वास आहे.संपुर्ण देशात सर्वप्रथम कारगील युध्दाचा 'आँखो देखा हाल'मांडता आला. शोध पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील चांगल्या घटना घडामोडी 'महाव्हाईस 'डिजिटल माध्यमातून समाजासमोर मांडणे हे माझ ध्येय आहे... संतोषकुमार गवई अकोला- 9689142973/9860699890
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: