जिल्ह्यात दोन विक्रेत्यांविरूद्ध गुन्हा…
अकोला – संतोषकुमार गवई
कृषी निविष्ठांच्या विक्रीत कुठेही गैरव्यवहार आढळून आल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात भरारी पथकांकडून तपासण्यांना वेग देण्यात आला आहे. कृषी विभागाच्या पथकाने अकोट तालुक्यातील उमरा येथे बुधवारी टाकलेल्या छाप्यात 75 हजार रू. चे बोगस बियाणे जप्त करण्यात आले. या पथकाने् केलेल्या मंगळवारी व बुधवारी केलेल्या दोन कारवायांत दोषी आढळलेल्या दोन विक्रेत्यांवर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोगस बियाणे जप्त
अकोट तालुक्यातील उमरा येथील निर्मल दिलीपसिंग तोमर (ठाकूर ) यांच्या शेतातील मोडकळीस आलेल्या घरात बोगस बियाणे असल्याबाबत गुप्त खबर जिल्हास्तरीय भरारी पथकाला मिळाली होती.
त्यानुसार याठिकाणी बुधवारी (29 मे) दुपारी.4 वा. च्या सुमारास मोहीम अधिकारी महेंद्रकुमार साल्के, ,जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सतिशकुमार दांडगे, कृषी अधिकारी भरत चव्हाण व अकोट ग्रामीण पोलीसांच्या पथकाने छापा टाकला. त्यात बोगस कापुस बियाण्याची 75 हजार 200 रू. ची एकुण 47 पाकिटे जप्त करण्यात आली. निर्मल तोमर (ठाकूर ) रा .उमरा ता .अकोट यांच्या विरुद्ध अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जादा दराने विक्री करणा-यावर गुन्हा दाखल
तेल्हारा तालुक्यातील अडसूळ येथील अश्विनी ऍग्रो एजन्सी (प्रोप्रायटर रामराव रामचंद्र पोहरे) या बियाणे विक्री केंद्रातून अजित-155 बीजी 2 या कापूस बियाण्याची जादा दराने विक्री होत असल्याबाबत माहिती मिळताच भरारी पथकाने तत्काळ कार्यवाही केली. मंगळवारी दुपारी 12 वा. च्या सुमारास मोहिम अधिकारी महेंद्रकुमार साल्के यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पथकाने डमी ग्राहकांच्या माध्यमातून या बियाणे विक्री केंद्रावर छापा टाकला.
छाप्यात अजित सीड्स उत्पादित संकरित कापूस बियाणे वाण अजित -155 बीजी 2 ची प्रति पाकीट 1 हजार 400 रु. याप्रमाणे जादा दराने विक्री होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे कृषी अधिकारी श्री. चव्हाण यांच्या तक्रारीवरून विक्री केंद्राचे प्रोप्रायटर रामराव रामचंद्र पोहरे यांच्या विरोधात बियाणे कायदा 1966, बियाणे नियंत्रण आदेश 1983,कापुस बियाणे किंमत (नियंत्रण ) आदेश -2015, महाराष्ट्र कापूस बियाणे कायदा -2009, महाराष्ट्र कापुस बियाणे नियम -2010 अन्वये तेल्हारा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पथकात जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सतीशकुमार दांडगे, तालुका कृषी अधिकारी भरत चव्हाण, विस्तार अधिकारी गौरव राऊत, कोमल भास्कर, कृषी सहायक प्रदीप तिवाले आदींचा समावेश होता. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,अकोला शंकर किरवे व कृषी विकास अधिकारी मिलिंद जंजाळ यांनी मार्गदर्शन केले.