अकोला – संतोषकुमार गवई
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत पशु संवर्धन व दुग्ध शास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय, नागपुर येथे मा. कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या संकल्पनेतून देशी गोवंश वृद्धीकरणासाठी भ्रूण प्रत्यारोपणाचा महत्वकांक्षी प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.
नुकतेच या विभागामध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करून सहीवाल जातीच्या कालवडीचा जन्म झाला. हा महत्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान, विद्यापीठ नागपुर यांच्या तांत्रिक सहभागातून राबविण्यात येत असून या करिता डॉ. डी. एस. रघुवंशी, डॉ. ए. पी. गावंडे तसेच डॉ. मनोज पाटील यांनी सदर प्रकल्प यशस्वीरित्या राबविण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली आहे.
या तंत्रज्ञानाचा वापर करून तिरूपतीच्या कृषि विद्यापीठात सर्व प्रथम 1986 साली वासराचा जन्म झाला. त्यानंतर इतर ठिकाणी सुद्धा भ्रूण प्रत्यारोपणाचे कार्य भारतामध्ये सुरू झालेले आहे. महाराष्ट्रात डॉ. श्याम झंवर यांनी लळींग (धुळे) येथे मेंढयांमध्ये तर डॉ. सुरेश गंगावणे यांनी नाशिक येथे गायी मध्ये भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा अवलंब केला.
ही एक पशु क्षेत्रातील प्रगतीच आहे. पशु संगोपन क्षेत्रामध्ये अत्याधुनिक तंत्रद्यान म्हणून भ्रूण प्रत्यारोपण किंवा एम्ब्रियो ट्रान्सप्लांट तंत्राचा वापर केल्यास स्थानिक पशुच्या सुधारणेमध्ये प्रगती साधता येते कारण आजही पशुधंनाचा विचार केल्यास 70 टक्क्याहूनही स्थानिक जनावरे ही अल्प उत्पादक आहेत.
या तंत्रज्ञानाचा वापर करताना भ्रूण प्रत्यारोपणामध्ये उच्च प्रतीचा उत्पादनक्षमता असलेला दाता (डोनर) मादीच्या गर्भाशयाच्या अंतर त्वचेला भ्रूणाचे रोपण किंवा भ्रूण चिकटण्यापुर्वीच गोळा करण्यात येतो व भ्रूण समान ऋतुचक्राच्या अवस्थेत असलेल्या कमी उत्पादनक्षम मादीच्या गर्भाशयात एक विशिष्ठ नळीद्वारे सोडण्यात येते.
भ्रूण प्रत्यारोपणामुळे उच्च उत्पादन क्षमता असलेल्या मादीपासून जास्तीत जास्त अपत्य आपल्याला मिळविता येतात. त्याचप्रमाणे कमी उत्पादन क्षमता असलेल्या मादीचा दायी म्हणून वापर करता येतो. या शिवाय गर्भाशयात भ्रूण प्रत्यारोपण करण्यापूर्वि वासराचे लिंग ठरविता येवून दोन पिढ्यातील अंतर कमी करता येते. भ्रूण अवस्थेत भ्रूणाचे विभाजन करून एक सारखीच दोन वासरे निर्माण करता येतात.
सदर पथदर्शी कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्याकरिता कृषि महाविद्यालय नागपुर येथील सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश कडू यांचे वेळो वेळी मार्गदर्शन लाभले. पशु संवर्धन व दुग्ध शास्त्र विभागातील दुग्धशाळा व्यवस्थापक डॉ. कविता कडू तसेच डॉ. मोटघरे, (पशूवैद्यक शास्त्र) यांनी सदर उपक्रम राबविताना शास्त्रोक्त पद्धतीने जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये प्रामुख्याने लक्ष दिले.
जातिवंत गोवंश संवर्धन व वृद्धीकरण प्रकल्पाचे श्रेय कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या दुरदृष्टीपणास असून याकामी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान, विद्यापीठ, नागपुर येथील सहभागी शास्त्रज्ञ यांच्या तांत्रिक सुविधेस त्याचप्रमाणे पशु संवर्धन व दुग्ध शास्त्र विभाग, नागपुर येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सहयोगातुनच हें शक्य होत आहॆ.
प्रा. डॉ. विलास अतकरे, शाखा प्रमुख, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय,नागपूर.
विदर्भातील उपलब्ध गोवंशाची उत्पादकता वाढविण्यासाठी संतुलित आहार-विहारासह भ्रूण प्रत्यारोपण, सेक्स सोर्टेड सिमेन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर काळसुसंगत ठरणार असून आमच्या विद्यापीठाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्या नागपूर व अकोला येथील प्रक्षेत्रावर जातिवंत गोवंश सुधारासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. गावापातळीवर असे उपक्रम राबविल्यास विदर्भासाठी दुग्धव्यवसाय फायदेशीर ठरेलं.डॉ. शरद गडाख कुलगुरू डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला.