नांदेड – महेंद्र गायकवाड
नांदेड-वाघाळा महानगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त सुशिलकुमार खोडवेकर यांच्याबद्दल जातीचा उल्लेख करून अपमानित केल्या प्रकरणी विशेष न्यायाधीश एस.ई. बांगर यांनी सेवानिवृत्त शिक्षक जफर अली पठाण यांना अट्रॅसिटी कायद्यानुसार ६ महिने शिक्षा आणि १ लाख रुपये रोख दंड ठोठावला आहे.
शहरातील मदिनानगर येथील सेवानिवृत्त शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ता जफर अली खान महेमुद अली खान पठाण यांनी दि.१३ एप्रिल २०१५ ते २० एप्रिल २०१५ रोजी जातीवाचक शब्दाचा वापर करून मनपा आयुक्त सुशिलकुमार खोडवेकर यांच्याविरुध्द अनेक निवेदने दिली. यात अपमानजनक वर्णन केले.
या प्रकरणी सुशिलकुमार खोडवेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अट्रॅसिटी कायद्यानुसार गुन्हा क्रमांक ४४/२०१५ दाखल करण्यात आला. या प्रकरणात तत्कालीन पोलीस उपअधिक्षक विजय कबाडे, पोलीस उपअधिक्षक संजय निकम यांनी या गुन्ह्याचा तपास केला आणि न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. या प्रकरणात ७ जणांची साक्ष नोंदविण्यात आली.
न्यायाधीश एस.ई. बांगर यांनी या प्रकरणाचा निकाल देतांना अॅट्रॉसिटी कायदा कलम ३(१) (१०) आणि भारतीय दंड संहितेच्या कलम ४९९, ५०० अर्थात बदनामी करणे यासाठी जफर अली खान पठाणला दोषी मानून दोन वेगवेगळ्या कायद्यांमध्ये प्रत्येकी ६ महिने शिक्षा आणि दोन कायद्यांमध्ये प्रत्येकी ५० हजार रुपये रोख असा १ लाख रुपये दंड ठोठावला. दंडाच्या रुपयांपैकी ७५ हजार रुपये रक्कम सुशिलकुमार खोडवेकर यांना देण्याचे आदेश न्यायाधीश बांगर यांनी दिले आहेत.