आकोट – संजय आठवले
आकोट पोलीस स्टेशन अंतर्गत पोलिसांच्या मारहाणीत आरोपीचा मृत्यू झाल्याच्या संशयावरुन अटकेत असलेले पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे यांचे जामीन अर्जावर १६ मे रोजी सुनावणी होणार असून तपास यंत्रणेने या जामीनास विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. त्यातच प्रकरणातील फिर्यादीने याप्रकरणी सरकारी वकिलांना सहाय्य करणेकरिता आपला खाजगी वकील नियुक्त केला असून होणाऱ्या या सुनावणीमध्ये नवीन खुलासा होण्याची शक्यता बळावली आहे.
आरोपीच्या खुनाचे संशयावरून पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे यांना आकोट न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर जवरे यांना अकोला कारागृहात ठेवण्यात आलेले आहे. यादरम्यान सीआयडीमार्फत ह्या प्रकरणी तपास सुरू आहे. हा तपास अपूर्णावस्थेत असतानाच जवरे यांचेमार्फत आकोट न्यायालयात जामीन याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर दिनांक १४ मे रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. मात्र ही सुनावणी टळली असून आता ती १६ मे रोजी होणार आहे.
ह्या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक श्रीमती दीप्ती ब्राह्मणे गुन्हे अन्वेषण विभाग अमरावती यांचे कडे देण्यात आलेला आहे. मात्र त्या रजेवर गेल्याने या प्रकरणाचा तपास नारायण सारंगकर पोलीस उपाधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग अमरावती हे करीत आहेत. त्यांचेकडून राजेश जवरे यांचे जामीनास विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. त्याकरिता आकोट न्यायालयात से दाखल करण्यात आला आहे. ह्या से मध्ये विविध मुद्द्यांवर जवरे यांचे जामीना विरोधी भूमिका स्पष्ट केली गेली आहे.
ह्या स्पष्टोक्ती मध्ये म्हणण्यात आले कि, जवरे आणि सोळंके यांना सहकार्य करणारे अन्य आरोपी अद्याप निष्पन्न होणे बाकी आहे. त्यानंतर ह्या आरोपींच्या घरझडत्या घेणे बाकी आहे. सध्या कारागृहात असलेल्या आरोपींना जामीन मिळाल्यास ते गुन्ह्यातील साक्षीदारांवर दबाव आणू शकतात. त्याद्वारे तपासात अडथळा निर्माण होऊ शकतो. मृदकाचे कुटुंबीय आकोट शहरातच मोलमजुरी करून राहतात. त्यामुळे अटकेतील व बाहेरील आरोपी मयताचे कुटुंबीयांना दबावात घेणे, आमिष दाखवून गुन्ह्याची माहिती देण्यास परावृत्त करणे असे प्रकार करू शकतात.
ह्या गुन्ह्यातील आरोपी हे डी.बी. पथकातील आहेत. त्यांना गुन्हेगारी विश्वातील संपूर्ण माहिती आहे. त्यांना जामीन मिळाल्यास ते साक्षीदारांचे जीवितास इतर गुन्हेगारांचे मदतीने धोका निर्माण करू शकतात. महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणात कुणी वरिष्ठ अधिकारी सामील आहे किंवा कसे ही माहिती आरोपीच देऊ शकतात. त्यामुळे त्यांना ती विचारपूस करणे बाकी आहे. म्हणून अटकेतील आरोपींना जामीन देण्यात येऊ नये अशी प्रार्थना सीआयडीचे वतीने न्यायालयात करण्यात येणार आहे.आणि सिआयडीची बाजू ज्येष्ठ सरकारी वकील अजित देशमुख हे मांडणार आहेत.
सीआयडी ची ही भूमिका असतानाच फिर्यादीने या प्रकरणात आपला खाजगी वकील नियुक्त केला आहे. त्या वकिलामार्फत फिर्यादी या प्रकरणी काही अन्य मुद्दे न्यायालयात मांडणार असल्याची माहिती आहे. या मुद्द्यांमुळे या प्रकरणाला आणखी कंगोरे फुटण्याची अटकळ आहे. ह्या अटकळीचे कारण आहे आकोट परिसरात वायरल होत असलेले एक निनावी पत्र. जे पोलिसांना पाठवण्यात आलेले आहे. या पत्रात नमूद करण्यात आले आहे कि, सदर प्रकरणातील आरोपींकडून मयताच्या म्हाताऱ्या आईला मारून टाकण्याचा डाव आखला जात आहे. त्याकरिता या म्हातारीचे घरात विषारी साप सोडून त्याचे दंशाद्वारे तिचे जीवन संपविले जाणार आहे.
या पत्रात पुढे म्हटले गेले आहे कि, राजेश जवरे यांचा मित्र असलेला एक व्यक्ती आपले पत्नीचे सहकार्याने मयताचे आईस धमकी देत आहे. ही धमकी देण्याकरिता त्या व्यक्तीचे पत्नीने मयताचे आईचे कानशिलावर चक्क पिस्तूलही रोखले. या घटनेचे साक्षीदार या म्हातारीचे शेजारी आहेत असा दावा या पत्रात करण्यात आला आहे. हे पत्र व्हायरल झाल्याने त्याबाबत मोठी खळबळ उडाली आहे. मात्र कोणत्याही निनावी पत्राची कोणतीही दखल न घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने काही काळापूर्वी दिलेले आहेत. त्यामुळे या पत्राची दखल घेऊन त्या अनुषंगाने तपास होणे दुरापास्त दिसत आहे.
ह्या पत्रात नमूद घटनांमधील पात्रांचा नामोल्लेखही करण्यात आला आहे. परंतु या पत्रासंदर्भात पोलिस विभागाकडून कोणतीही पुष्टी केली न गेल्याने हा पत्रप्रपंच निव्वळ एक खोडसाळपणा असल्याचा संशय व्यक्त होत आहे. एकीकडे ह्या पत्राबाबत असा संशय व्यक्त होत असतानाच दुसरीकडे दुसऱ्या एका प्रकरणाबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. हे प्रकरण आहे आकोट ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बोडके यांच्या बदलीचे. वास्तविक या प्रकरणातील मृत्यूशी त्यांचा काही एक संबंध नाही. या प्रकरणातील फक्त शवविच्छेदन अहवालाची अल्पशी चौकशी त्यांचेकडे होती.
त्या अनुषंगाने त्यांनी आपला अहवाल वरिष्ठांकडे सादर केला आहे. तरीही याप्रकरणी त्यांची बदली जिल्हा मुख्यालय येथे केली असल्याची बोलवा आहे. हा पोलीस अधिकारी आपल्या कामाशी काम ठेवणारा सरळ मार्गी अधिकारी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे ह्या प्रकरणाशी त्यांना जोडले जाणे अतिशय आश्चर्यकारक असल्याची जाणकारांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे आता राजेश जवरे यांचे जामीन प्रकरणातील सुनावणीमध्ये कोणते नवीन खुलासे होतात याकडे लक्ष लागलेले आहे.