मूर्तिजापूर तालुक्यातील ब्रम्ही येथील कमळगंगा नदीला काल दिनांक १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान पूर आल्याने दुथडी भरून वाहत होती पुलावरून पाणी जास्त प्रमाणात असल्याने मोटारसायकलसह वाहून जाणाऱ्या दोघांना ब्रम्ही येथील युवकांनी वाचविले. सध्या या युवकाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
मूर्तिजापूर येथून सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान गुंजवाडा येथील ऋषिकेश कैलास गावंडे व लंघापूर येथील संतोष वानखडे हे सुद्धा मूर्तिजापूरहून लंघापूरकडे जात असताना पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांच्या मोटारसायकल पुलावर असलेल्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने घसरल्या.
यावेळी दोघेही आपल्या मोटारसायकलसह पाण्यात वाहत जात असताना स्थानिक गावातील रवी उर्फ भायजी डाबेराव,किरण सळेदार,अनिल सळेदार, रवी इंगळे, प्रशांत इंगळे, नीलेश इंगोले, सुमीत वसुकर, शंकर इंगळे, प्रदीप इंगोले यांनी जिवाची पर्वा न करता दोघांचे प्राण वाचविले.
अश्या घटनाना अनेक वर्षांपासून नागरिकांना सामोरे जावे लागत आहे कारण सदर नदीवरील पुलांची उंची फारच कमी असून जुन्या पध्दतीने पुलाचे बांधकाम झालेले आहे त्यामध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी मोऱ्या बसविण्यात आल्या आहेत त्यांचे तोंड हे अरुंद आहे त्यामुळे पुरात वाहून येणारा कचरा त्यामध्ये जाऊन बसतो मग लगेच पुलावरून पाणी वाहण्यास सुरुवात होते आणि पाण्याचा प्रवाह जास्त प्रमाणात होत असल्याने नदीकाठी असलेल्या ब्रम्ही खुर्द गावाला त्याचा धोका निर्माण होतो आणि रस्त्यावरून वाहतूक करण्यांना तासन तास अडकून पडून वाहतूकिस अडथळा निर्माण होतो अशातच अत्यावश्यक रुग्ण घेऊन जाण्याची तारांबळ उडते पर्यायी व्यवस्था म्हणून ३० किलोमीटरचे अंतर पार करून माना मार्गे मूर्तिजापूर यावे लागते एवढया वेळेत रुग्णाच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी लोकप्रतिनिधी लक्ष घालून सदर पुलाची उंची वाढवून गावालगत संरक्षण भिंत उभारण्यात यावी अशी मागणी गावकरी करीत आहे. जेणेकरून भविष्यात होणाऱ्या घटनांना आळा बसेल.