अकोला – संतोषकुमार गवई
अकोला जिल्ह्यातील शेती क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाच्या समन्वयातून कृषी वसंत अभियान हा पथदर्शी कार्यक्रम येत्या खरीप हंगामापासून राबविण्यात येणार आहे.
अकोला जिल्हा हा निश्चित पावसाचा प्रदेश असून, येथील सरासरी पर्जन्यमान 694 मिमी आहे. खरीपात सोयाबीन, कापूस, तूर व रब्बीत गहू, हरभरा पीके घेतली जातात. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले अकोट व तेल्हारा हे दोन तालुका फलोत्पादन पीकांत आघाडीवर असून, संत्रा, केळी व भाजीपाला पिकांचे क्षेत्रही मोठे आहे.
बाळापूर तालुक्यातील वाडेगाव परिसर कागदी लिंबू या फळपीकासाठी प्रसिद्ध आहे. अकोला, मूर्तिजापूर तालुक्यात खारपाणपट्टा असल्याने सोयाबीन, कापूस, हरभरा ही पीके घेतली जातात. जिल्ह्यात गत तीन वर्षात फळपीक व भाजीपाला पिकांच्या क्षेत्रात वाढ होत आहे.
जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात असलेली अपुरी वाहतूक सुविधा, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्यातील नियोजनाचा अभाव, निविष्ठांसाठीचे भांडवल, अपु-या सिंचनसुविधा ही कमतरता दूर करण्यासाठी कृषी वसंत अभियान राबविण्यात येणार आहे. अभियानाबाबत सर्व यंत्रणांनी समन्वयाने नियोजन व अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत.
अभियानात सिंचनवृद्धीसाठी 400 शेततळी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. संत्रा, लिंबू, केळी, सीताफळ, ड्रॅगनफ्रूट आदी फळपीकांचे 2 हजार हेक्टर क्षेत्र वाढविण्याचे नियोजन आहे. दर्जेदार रोपे शेतक-यांना उपलब्ध करून देणे, रोपवाटिका बळकटीकरणासाठी एक कोटी रू. निधी प्रस्तावित आहे.
फुलांचे उत्पादन वाढविण्यासाठी 50 हेक्टर इतका लक्ष्यांक आहे. ओवा, हळद, जिरे, मोहरी आदी मसाला पिकांची 100 हेक्टर क्षेत्रवाढ प्रस्तावित आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानात हळद पिकासाठी प्रतिहेक्टर 12 हजार अनुदान आहे. सोयाबीन, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, करडई, जवस आदी तेलबिया पिकांसाठी प्रक्रिया केंद्रे, तसेच ज्वारी, बाजरी, नाचणी आदी तृणधान्य पिकाची 350 हे. क्षेत्रवाढ प्रस्तावित आहे.
सीताफळ, पेरू, जांभूळ, केळी आदी फळांवर प्रक्रियेसाठी 50 केंद्रे व 1 कोटी निधी प्रस्तावित आहे. ठिकठिकाणी शेतमाल गोदाम उभारणी, तसेच प्रति तालुका एक याप्रमाणे घरगुती बियाणे महोत्सव आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी सांगितले.