रामटेक – राजु कापसे
निमखेडा जवळील शांतीनगर येथे आज सकाळच्या सुमारास एकाच कुटुंबातील त्यांच्या राहत्या घरी मृतदेह आढळून आले. त्यामुळे परिसरात खळबळ माजली. हत्या की आत्महत्या याबाबत लोकामध्ये तर्क वितर्क लावल्या जात असले तरी, कुटुंब प्रमुखाने प्रथम पत्नी आणि मुलाची हत्या केली असावी आणि त्यानंतर स्वत: गळफास लावून आत्महत्या केली असावी असाही अंदाज वर्तविला जात आहे.
कुटुंबप्रमुख श्रीनिवास व्यंकटराव इडुपूगंटी (वय ५८), पत्नी पद्मलता श्रीनिवास इडुपूगंटी (वय ५४), मुलगा व्यंकटचंद्रशेखर श्रीनिवास इडुपूगंटी (वय २९) असे मृतकांची नावे आहेत. पहाटेच्या सुमारास कुटुंबप्रमुख श्रीनिवास यांची सुन हिने आरडाओरड केल्याने घराशेजारील लोकं जमा झाले. पत्नी आणि मुलगा मृत अंवस्थेत आढळून आले.
श्रीनिवास यांना नजीकच्या रुग्णालयात हलविले असता उपचारापूर्वीच त्यांचा देखील मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीनिवास यांनी प्रथम पत्नी पद्मलता आणि मुलगा व्यंकटचंद्रशेखर यांचा दोरीने गळा आवळून ठार केले आणि त्यानंतर स्वताला लाकडी आलमारी लटकवून दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.
श्रीनिवास यांचा राईस मिल आणि धानाचा व्यवसाय होता. बँकेचे आणि शेतकऱ्यांचे कर्जाचे डोंगर त्यांचेवर झाले होते. त्यामुळे ते मानसिक तणावात राहायचे. याच कारणामुळे त्यांनी प्रथम हत्या आणि नंतर आत्महत्या केल्याचा प्रार्थमिक अंदाज वर्तविला जात आहे.
याबाबतची तक्रार हरिचंद्रप्रसाद गंगाराजू इडुपूगंटी यांनी अरोली पोलिसात दिली. पोलिसांनी ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार निशांत फुलेकर करीत आहेत.
घटनास्थळी नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधीक्षक धुमाळ, रामटेकचे उपविभागीय पोलिस अधीक्षक रमेश बळकते यांच्यासह अरोली पोलिस होते. शांतीनगर येथे पोलिस छावनीचे स्वरूप आले होते. फॉरेन्सिक चमू, श्वान पथक आणि फिंगर तपासणी पथक बोलावण्यात आले होते.
घटनास्थळावरुन नमुने गोळा करण्यात आले असून पुढील तपास अरोलीचे ठाणेदार निशांत फुलेकर करीत आहेत. मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता मौदा येथे पाठविण्यात आले. उत्तरीय तपासणी अहवालानंतर आणि तपासानंतर मृत्यूचे नेमके कारण कळेल.
श्रीनिवास इळूपूगंटी यांनी पंढरा वर्षांपूर्वी अरोली निमखेडा रस्त्यावरील तुमान येथे व्यंकटेश राईस मिल उभारली. राईस मिलचा स्टीमसह मोठा प्लांट असून गोडाऊन देखील आहे. त्यांच्याकडे शेती देखील तीस एकरच्या जवळपास असल्याची माहिती आहे. धान खरेदी करून त्याची मिलिंग करून तांदूळ मोठमोठ्या शहरात विक्री करायचा.
मधल्या काळात धानाचे भाव कमी झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाल्याचे कळते. त्यामुळे ते आर्थिक अडचणीत आले होते. शेतकऱ्यांचे आणि बँकेचे कर्ज वाढले असून त्यांचा पैशासाठी तगादा सुरू होता. असे बोलले जात असले तरी मृत्यूचे आणखी दुसरे कारण असू शकते असा संशय देखील वाढला आहे.